ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढतच आहे. मागील 24 तासात आता पर्यंतचे सर्वाधिक म्हणजेच 19,218 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 378 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 8 लाख 63 हजार 062 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 25 हजार 964 एवढा आहे. त्यामुळे राज्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

शुक्रवारी दिवसभरात 13,289 रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत 6 लाख 25 हजार 773 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 2 लाख 10 हजार 978 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 72.51 % आहे. तर मृत्यू दर 3.01 % आहे.

प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 44 लाख 66 हजार 249 नमुन्यांपैकी 8 लाख 63 हजार 062 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 14 लाख 51 हजार 343 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 36 हजार 873 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.








