ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडात कोरोनाची दुसरी लाट अधिक घातक बनत चालली आहे. या महामारीने जनतेचे रक्षण करणाऱ्या पोलिसांना देखील आपले शिकार बनवले आहे. प्रदेशात आतापर्यंत 2 हजार पोलिसांना कोरोनाची लागण झली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यातील 300 पोलीस हे देहरादूनमधील आहेत. तर 235 जवान उधमसिंह नगर आणि 222 जण हरिद्वार जिल्ह्यातील आहेत. दरम्यान, 2000 पोलिसांपैकी 1800 पोलिसांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतले होते तरी देखील त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे समोर आले आहे. तर 200 पोलिसांनी अजून दुसरा डोस मिळालेला नाही आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये सध्या भीतीचे सावट निर्माण झाले आहे.
- शुक्रवारी 5,775 नवे बाधित
मागील 24 तासात 5 हजार 775 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. तर 116 रुग्णांचा मृत्यू झाला. तर कालच्या 4 हजार 483 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे प्रदेशात एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 77 हजार 585 इतकीझाली आहे. यातील 1 लाख 88 हजार 690 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील 24 तासात 23,319 नमुने निगेटिव्ह आले आहेत. काल देहरादून जिल्ह्यात 1583 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर उधमसिंह नगर 692, हरिद्वारमध्ये 844, नैनिताल 531, उत्तरकाशीमध्ये 286, पौडीमध्ये 359, टिहरी 349, अल्मोडा 267, रुद्रप्रयाग 285, चमोली 201, चंपावत 115, पिथोरागडमध्येे 225 आणि बागेश्वर जिल्ह्यात 38 रुग्ण आढळून आले आहेत.
प्रदेशात आतापर्यंत 4426 (1.59%) जणांचा मृत्यू झाला आहे. सद्य स्थितीत प्रदेशात 79,379 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर संसर्गाचा दर 6.60 आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 67.98 % इतके आहे.









