प्रतिनिधी / बेळगाव
गोवावेस जलतरण तलावाच्यासमोर चेंबरसाठी घालण्यात आलेल्या लोखंडी सळय़ा बाहेर पडल्या होत्या. यामुळे वाहनांना लागून वारंवार अपघात होत होते. याबाबत तक्रारी करूनदेखील त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने अखेर गोवावेस येथील पंचवटी गणेश मारुती रिक्षास्टँडच्या रिक्षा चालकांनी सळय़ा तोडून बाजूला केल्या. यामुळे वाहनचालकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
जलतरण तलावापर्यंत काँक्रिटचा रस्ता करण्यात आला आहे. त्यानंतर शेजारीच असणारे चेंबर वाहनांना लागत होते. वाहनांचा खालील भाग या चेंबरला लागून त्यातील सळय़ा बाहेर आल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी या सळय़ा चार चाकी वाहनांमध्ये अडकून अपघात झाला होता. यामुळे या रिक्षाचालकांनी आपणच याची दुरुस्ती करण्याचे ठरविले. धोकादायक असलेल्या सळय़ा तोडून बाजूला करण्यात आल्या. यामुळे वाहने अडकण्याचे प्रकार काही प्रमाणात कमी होणार आहेत.
यावेळी रिक्षाचालक अमित राऊत, शशी पाष्टे, सागर पुजारी, विनायक मजुकर, यल्लाप्पा हलगेकर, जोतिबा पाटील, लोकेश हुंदरे, माणिक उपाध्ये यांच्यासह इतर रिक्षाचालक उपस्थित होते.









