लक्ष्मीनगर-जुने बेळगावातील कुटुंबाची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
लक्ष्मीनगर जुने बेळगाव येथील कोरवी गल्लीमधील नाकाडी कुटुंबीयांच्या घराला लागून बसविण्यात आलेला वीजखांब आणि ट्रान्स्फॉर्मर धोकादायक ठरत आहे. यामुळे नाकाडी कुटुंबीयांना भीतीच्या छायेखालीच वावरावे लागत आहे. याबाबत कित्येकवेळा हेस्कॉमकडे तक्रारी देऊनदेखील साफ दुर्लक्ष झाल्याने नाकाडी कुटुंबीयांतून संताप व्यक्त केला जात आहे. घराशेजारी भिंतीला लागून वीजखांब आहे. या वीजखांबावरच ट्रान्स्फॉर्मर बसविण्यात आला आहे. पाऊस-वाऱयामुळे हा विद्युतभारीत खांब भिंतीवर झुकला आहे. या उच्चदाबाच्या विद्युतखांबामुळे घरात रहाणेदेखील कठीण झाले आहे. घरात लहान मुले असल्यामुळे चुकून या विद्युतखांबाला स्पर्श झाल्यास मोठा अनर्थ घडू शकतो. त्यामुळे हेस्कॉमने याची दखल घेऊन तातडीने विद्युतखांब आणि ट्रान्स्फॉर्मर इतरत्र हलवावा, अशी मागणी नाकाडी कुटुंबीयांनी केली आहे.
हेस्कॉमने विद्युतखांबाच्या खाली काँक्रिटीकरण करून खांब मजबूत केला असला तरी इमारतीवर झुकलेला असल्याने स्लॅबवर ये-जा करणेही धोक्याचे बनले आहे. उच्चदाबाच्या विद्युतवाहिन्यांमुळे दररोज भीतीच्या छायेखालीच रहावे लागत आहे. त्यामुळे तातडीने विद्युतखांब हटवावा, अशी मागणी नाकाडी कुटुंबीयांनी केली आहे.









