सौरव गांगुली यांचे प्रतिपादन, कोव्हिड-19 महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने बीसीसीआय अध्यक्ष व्यथित
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोव्हिड-19 महामारीच्या उद्रेकामुळे निर्माण झालेल्या भीतिदायक परिस्थितीमुळे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली खूपच दुखी झाले असून ही परिस्थिती म्हणजे धोकादायक खेळपट्टीवर कसोटी सामना खेळण्यासारखी आहे, अशी व्यथित भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
कोरोना व्हायरस महामारीमुळे जगभरात सुमारे अडीच लाख बळी गेले असून 34 लाखाहून अधिक जणांना त्याची लागण झालेली आहे. या महामारीमुळे अनेक देशांप्रमाणे भारतातही लॉकडाऊन करावे लागले आहे. या लॉकडाऊनमधील आयुष्याबद्दल गांगुली यांनी आपली मते मांडली. ‘धोकादायक खेळपट्टीवर कसोटी खेळण्यासारखीच ही परिस्थिती आहे. यात चेंडू स्पिन आणि सीम दोन्हीही होत असल्याने फलंदाजाला हलकीशी चूकही महाग पडू शकते. त्यामुळे फलंदाजांना कोणतीही चूक न करता धावाही करायच्या आहेत आणि विकेटही सुरक्षित ठेवून कसोटी जिंकायची आहे,’ असे गांगुली ‘100 तास 100 स्टार्स’ या फीव्हर नेटवर्कने सुरू केलेल्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले.
गांगुली यांनी क्रिकेट कारकिर्दीत अनेक घातक वेगवान गोलंदाज व दर्जेदार फिरकी गोलंदाजांविरुद्धची मैदानावरील युद्धे जिंकली आहेत. त्यामुळे खेळातील कठीण प्रसंग आणि सध्याचे मानवी आरोग्यावर आलेले संकट, यांची तुलना करण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. ‘ही खरोखरच अतिशय कठीण कसोटी आहे, मात्र आम्ही सगळे एकत्रित प्रयत्न करून निश्चितपणे विजय मिळवू शकेन, अशी मला खात्री वाटते,’ असे ते म्हणाले. या महामारीत अनेकांचे बळी गेले असून न भरून येणारे नुकसानही झाले आहे, याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले. ‘सध्याची परिस्थिती पाहून मी खूप व्यथित झालो आहे. कित्येक लोकांना याचा त्रास सहन करावा लागत असून या महासाथीला कसे रोखायचे, तेही कळेनासे झाले आहे. जगभरातील ही स्थिती चिंताजनकच आहे. ते कुठून, केव्हा, कसे आले आम्हाला माहित नाही. मुकाबला करण्याची तयारी नसतानाच त्याचे आगमन झालेय. या व्हायरसमुळे कोणते संकट समोर येणार, याची आता भीती वाटू लागली आहे. अनेकांची बळी जात असल्याने चिंता वाढू लागली आहे,’ अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. माझ्या घरी किराणा साहित्य, धान्य देण्यासाठी येणाऱयांचीही आता भीती वाटू लागली आहे. त्यामुळे ही परिस्थिती लवकरात लवकर संपुष्टात यावी, असे वाटत असल्याचेही ते म्हणाले.
दक्ष राहण्याची शिकवण
कोणत्याही कठीण परिस्थितीला सामोरे जाण्याची शिकवण आणि कोणत्याही संकटाशी मुकाबला करण्यासाठी कायम दक्ष राहण्याचे महत्त्व क्रिकेटने आपल्याला शिकविले असल्याचेही ते म्हणतात. ‘प्रचंड दडपण असणाऱया आणि आयुष्यात येऊ शकतील, अशा कठीण प्रसंगांना मी क्रिकेट खेळताना सामोरे गेलो आहे. एक चेंडू बाकी असताना धावा करायच्या असतात तेव्हा एकही चूक, चुकीची हालचाल करून चालणार नसते. कारण तुम्हाला दुसरी संधी मिळणार नसते. अशा प्रसंगातून तुम्ही दक्ष आणि जागरूक राहण्यास शिकता, ज्याचा प्रत्यक्ष जीवनातही उपयोग होतो,’ असे त्यांनी स्पष्ट केले. लॉकडाऊनमुळे दीर्घकाळानंतर कुटुंबीयांसमवेत जास्त वेळ घालविता येत असल्याचेही ते म्हणाले. कामामुळे मला सतत प्रवास करावा लागतो. त्यामुळे कुटुंबीयांना पुरेसा वेळच देता येत नाही. पण गेला महिनाभर ही संधी मिळाली असल्याने मी त्याचा आनंद लुटतोय, असेही ते म्हणाले.









