मुंबई / वृत्तसंस्था
कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाज अजिंक्य रहाणे धोंडशिरेच्या दुखापतीमुळे उर्वरित आयपीएलमधून बाहेर फेकला गेला आहे. केकेआरने आपल्या ट्वीटवर हँडलवरुन याची माहिती दिली. ‘उर्वरित हंगामात रहाणेची आम्हाला प्रकर्षाने उणीव जाणवत राहील. रहाणे दुखापतीतून शक्य तितक्या लवकर सावरेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे’, असे त्यांनी ट्वीट केले.
अजिंक्य रहाणेने देखील त्याच ट्वीटमध्ये आपण केकेआरमधून खेळण्याचा अनुभव उत्तम राहिला असल्याचे नमूद केले. ‘मी मैदानात व मैदानाबाहेर केकेआर संघसहकाऱयांसमवेत प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला. क्रिकेटपटू या नात्याने काही नवे धडे आत्मसात केले. पुढील वर्षी आणखी मजबुतीने परतण्याचा माझा प्रयत्न असेल. या हंगामात कोलकाता प्ले-ऑफमध्ये पोहोचेल, अशी अपेक्षा आहे’, असे रहाणे याप्रसंगी म्हणाला.









