क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सध्या जगात हाहाकार माजला आहे. समाजातील कित्येक घटकांचे विविध माध्यमांतून या महामारीशी मुकाबला करण्यासाठी सध्या प्रयत्न चालू आहेत. अशाच एका जनजागृती करण्याच्या प्रयत्नात मडगावच्या धिती आणि सौम्या लोटलीकर या भगिनीनी आपल्या मोहक आवाजात गाणे गात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याचे आणि लोकांना सुरक्षितेच्या कारणस्तव आपल्याच घरी राहाण्याचे आवाहन केले आहे.
धिती आणि सौम्या या प्रसिद्ध कवी आणि लेखक असलेले संतोष लोटलीकर यांच्या कन्या असून त्यानी लिहिलेल्या या गाण्याला प्रवीण नाईक यांनी संगीत दिले आहे. दोन्ही लोटलीकर भगिनी या गोव्याच्या प्रतिभावंत बॅडमिंटनपटूही आहेत. सध्या संतोष लोटलीकर यांनी ऑनलाईनवर हे गाणे फेसबूक वॉलवर रिलीज केले असून त्याला केवळ तीन तासातच दोनशेहून अधिकांनी शेअर तर चार हजारांनी व्हिव्स केले आहे. लोटलीकर भगिनींचे हे गाणे गोवा बॅडमिंटन फेसबूकवर उपलब्ध आहे.
धिती आणि सौम्या लोटलीकर या भगिनीनी राष्ट्रीय बॅडमिंटन स्तरावर गोव्याचे प्रतिनिधीत्व केले आहे. दोघेही फातोर्डा येथील मल्टिपर्पझ इनडोअर हॉलमध्ये प्रशिक्षक शर्मद महाजनच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत. प्रसिद्ध कोंकणी गायिका लॉर्नाच्या ‘अपघात‘ या विडियो गाण्याने धिती लोटलीकर प्रथम प्रसिद्धीस आली. दोन वर्षापूर्वी येथील विद्या विकास अकादमीत नववीच्या वर्गात शिकणाऱया धितीला अखिल गोवा कोंकणी गीत गायन स्पर्धेत जेतेपदाचा पुरस्कारही मिळाला आणि ती आणखी प्रसिद्धीस आली. धितीची लहान बहीण सौम्याचा आवाजही तेवढाच गोड आहे.
लोकडाऊन ही जरी आमच्यासाठी कठीण वेळ असली तरी तिने आम्हाला आमच्या आरोग्य आणि स्वच्छतेविषयी जाणून दिले आहे. आपल्या कुटूंबासमवेत वेळ घालविण्याची संधीही प्राप्त करून दिल्याचे धिती म्हणाली. सकाळी माझी ऑनलाईन क्लास संपल्यानंतर मी माझा वेळ स्कॅचिंग करण्यात, विविध भाषेतील गाणी ऐकण्यात, सिनेमा बघण्यात तसेच नंतर एक तास फिटनेससाठी घालविते, असे सध्या विद्या विकास अकादमीत बारावीच्या वर्गात शिकणारी धिती म्हणाली.
केवळ एक छंद म्हणून मी माझे वडील आणि बहिणीसमवेत गाण्यास सुरूवात केली. त्यानंतन वडिलांच्या प्रोत्साहानाने कौटूंबिक कार्यक्रमात गाणी गायली. त्यानंतर विविध गायन स्पर्धेत भाग घेतला अन बक्षीसेही मिळविली व यामुळे आत्मविश्वासही वाढला असे महाराष्ट्र पत्रकार फाऊंडेशनचा प्रतिष्ठतेचा भास्कर पुरस्कार प्राप्त धिती म्हणाली. लॉकडाऊन संपल्यानंतर मला माझ्या फिटनेस, बॅडमिंटन आणि अभ्यासावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे धिती शेवटी म्हणाली.









