राणीने प्रतारणा केली म्हणून राजा निराश झाला होता. त्याला नोस्ट्रडाम्स नावाचा ज्योतिषी भेटला. राजा त्याला म्हणाला,
यां चिन्तयामि सततं मयि सा विरक्ता
साप्यन्यं इच्छति जनं स जनो।़न्यसक्तः ।
अस्मत्कृते च परिशुष्यति काचिद् अन्या
धिक् तां च तं च मदनं च इमां च मां च ।।
यावर नोस्ट्रडाम्स खळखळून हसला आणि म्हणाला, “राजन, एवढय़ाशा गोष्टीवरून निराश का होतोस? नियती सगळं बघते आणि न्यायनिवाडा करते. पुढच्या जन्मी तू आटपाट नगरीत नगरसेवक असशील. देशात एका भयानक रोगाची साथ येईल. महिनो न् महिने नागरिक अडकून पडतील. देशाचे अर्थचक्र ठप्प होईल. तेव्हा सर्व नागरिकांमध्ये मोफत वाटण्यासाठी तुला सम्राटांकडून अन्नधान्याची पोती मिळतील. त्यात घपला करताना तू विजनवासात जाशील. तेव्हा मी एका निर्भीड पत्रकाराच्या रूपात तुला भेटायला येईन. आज झालेल्या अन्यायाचे तेव्हा पूर्ण परिमार्जन झालेले असेल. नियती सब का हिसाब करेगी.’’
खरोखरच तसे झाले. राजा पुढच्या जन्मी आटपाट नगरातल्या सत्तारूढ पक्षाचा नगरसेवक बनला. नगरात कोरोनाची साथ आली. राजाकडे अन्नधान्याची पोती आली. टीव्हीवाल्यांसमोर त्याने काही पोत्यांचे वाटप केले आणि आपली बातमी झळकवून घेतली. कालांतराने रोगाची लागण होत असताना तो विजनवासात गेला. मग एका प्रामाणिक पत्रकाराच्या रूपात नोस्ट्रडाम्स त्याला भेटायला आला आणि पूर्वजन्मीचे स्मरण देत खरे बोलायला सांगितले. तेव्हा राजा म्हणाला, “रोगाची साथ आल्यावर मोफत वाटपासाठी धान्याची पोती आली होती. पण पुढच्या वेळी प्रभागांची फेररचना होईल या भीतीने मी थोडेसेच वाटप करून टीव्हीवर बातमी आणली. उरलेले धान्य शेजारच्या प्रभागात वाटण्यासाठी विश्वासू कार्यकर्ता अश्वपालला सांगितले. अश्वपालच्या मनात पुढच्या वेळी स्वतः निवडणूक लढवण्याचा बेत होता. म्हणून त्याने वेगळय़ाच प्रभागात पोत्यांचे वाटप केले आणि स्वतःची बातमी छापून आणली. त्या प्रभागातले बहुतांश नागरिक माझ्याच जातीतले आहेत आणि अश्वपालकडून धान्य घेऊन ते मलाच मत देतील. त्यामुळे माझी तिथली सीट पक्की आहे…. पण एकच दु:ख आहे. टीव्हीवर झळकण्याच्या नादात मी माझे मूळ मतदार, अश्वपाल आणि नव्या प्रभागातले मतदार आम्ही सगळेच बाधित झालो.’’
“मी तुला आधीच सांगितलं होतं, नियती सब का हिसाब करेंगी.’’
आणि नोस्ट्रडाम्स अदृश्य झाला.








