प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव जिल्हय़ात कोरोनाच्या रुग्णांमध्ये कमालीची वाढ होत आहे. त्यामुळे रविवारचा लॉकडाऊन अत्यंत गांभीर्यपूर्वक पाळला जात आहे. सलग तिसऱया रविवारी शहर व तालुक्मयात कडकडीत लॉकडाऊन पाळण्यात आला. रस्ते, बाजारपेठा रविवारी निर्मनुष्य होत्या. सर्वत्र शांतता व शुकशुकाट पहायला मिळत होता. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊनमध्ये आपला सहभाग दर्शवून दिला.
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत असल्याने सरकारने प्रत्येक रविवारी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. याप्रमाणे बेळगाव जिल्हय़ात मागील दोन रविवार कडकडीत लॉकडाऊन होते. कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे तसतशी त्याची धास्ती वाढत आहे. यामुळे कुटुंबीयांसोबत घरीच राहून नागरिक रविवारचा दिवस घालवत आहेत.
शनिवारी रात्री आठ वाजल्यापासून या लॉकडाऊनला सुरुवात झाली. सोमवारी सकाळी 5 वाजेपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. कडकडीत लॉकडाऊन पाळून कोरोनाचे चक्र थोपविण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे. यामध्ये नागरिकही स्वयंस्फूर्तीने सहभागी होत असल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाची धास्ती फक्त रविवारीच?
कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी शासनाकडून दर रविवारी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. याला नागरिकांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे. मात्र कोरोनाची धास्ती फक्त रविवारीच घेतली जात आहे. अन्य दिवशी कोरोनाची धास्ती कोणीच घेत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूची लागण केवळ रविवारी एकाच दिवशी होते का? असा मुद्दा उपस्थित होऊ लागला आहे. रविवारी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केलेले नागरिक दुसऱयाच दिवशी मात्र मोकाट फिरत असल्याचे चित्र आहे.









