‘दिल्ली-देहरादून शताब्दी’मध्ये दुर्घटना- सुदैवाने जीवितहानी टळली
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीहून देहरादूनला जाणाऱया शताब्दी एक्स्प्रेसच्या एका बोगीला आग लागल्याची घटना शनिवारी घडली. देहरादूनच्या दिशेने जात असताना कांसरो स्थानकाजवळ राजाजी व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य भागात ही घटना घडली. कोचला आग लागल्याची माहिती मिळताच मोटरमनने इमर्जन्सी ब्रेक लावत एक्स्प्रेस थांबवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. रेल्वे थांबवल्यानंतर आग लागलेला डबा रेल्वेपासून वेगळा करण्यात आल्याने अन्यत्र आग पसरू शकली नाही. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे. दुर्घटनेवेळी सदर बोगीतून 35 जण प्रवास करत होते.
दिल्लीवरून देहरादूनच्या दिशेने निघालेल्या शताब्दी एक्स्प्रेसच्या एका बोगीमध्ये आगीचा भडका उडाला. गाडी धावत असतानाच इंजिनपासून आठव्या बोगीत आग लागली. काही वेळातच बोगीमध्ये झपाटय़ाने आग पसरली. मात्र, घटनेची माहिती मिळताच इमर्जन्सी ब्रेक लावून गाडी थांबवण्यात आली. तोपर्यंत आगीचे लोळ बाहेर पडून लागले होते. त्यामुळे तातडीने बोगीतील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला असून रेल्वे मंत्रालयाने यासंबंधी सविस्तर अहवाल मागवला आहे. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्याची माहिती उत्तराखंडचे पोलीस महासंचालक अशोक कुमार यांनी दिली. या आगीत पूर्ण बोगी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने बेचिराख झाली आहे.
……









