स्मार्ट सिटीच्या अर्धवट कामांचा वाहनचालकांना फटका
प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. बऱयाच ठिकाणी स्मार्ट सिटीअंतर्गत कामे अर्धवट स्थितीत असल्याने याचा फटका वाहनचालकांना बसू लागला आहे. बुधवारी सकाळी धारवाड रोड येथे ट्रक रस्त्यावर खोदण्यात आलेल्या चरीमध्ये अडकला. ट्रक रस्त्यामध्ये अडकल्याने वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागला.
स्मार्ट सिटीअंतर्गत शहराची निवड झाल्यापासून कॉंक्रिटचे रस्ते व गटारी केल्या जात आहेत. परंतु कामात सुसूत्रता नसल्याने शहरात अनेक ठिकाणी कामे अर्धवट आहेत. त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. बुधवारी असाच एक ट्रक रस्त्यावरून जाताना खड्डय़ामध्ये अडकला. ट्रकमध्ये साहित्य भरलेले असल्याने वाहतुकीची कोंडी झाली.
ज्या ठिकाणी ट्रक अडकला होता तेथे खोदकाम केल्याची माहिती मिळाली आहे. खोदलेल्या ठिकाणी ट्रकचे चाक अडकल्याने वाहनचालकाला नाहक मनस्ताप सहन करावा लागला. ट्रक बाहेर काढण्यासाठी बराच वेळ धडपड सुरू होती. शहरात असे प्रकार वारंवार घडत असल्याने स्मार्ट सिटीच्या कामांबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.









