सात अधिकाऱयांना एसीबीचा दणका- बेहिशेबी मालमत्ता संपादनप्रकरणी कारवाई
प्रतिनिधी/ बेंगळूर
भ्रष्ट अधिकाऱयांवरील कारवाई सुरूच असून मंगळवारी भ्रष्टाचार प्रतिबंधक दलाने बेंगळूर, धारवाडसह राज्यातील 30 ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले. यामुळे भ्रष्ट अधिकाऱयांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे. विविध खात्यातील 7 अधिकाऱयांवर छापे टाकण्यात आले असून रोख रक्कम, सोने, बेहिशेबी स्थावर मालमत्तेसंबंधीची कागदपत्रे एसीबीच्या हाती लागली आहेत.
बेंगळूर शहर, धारवाड, बळ्ळारी, मंगळूर, कोलार, चित्रदुर्ग आणि बिदर या जिल्हय़ांमध्ये भ्रष्ट अधिकाऱयांच्या निवासस्थानांसह एकूण 30 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत, अशी माहिती एसीबीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सिमंतकुमार सिंग यांनी दिली.
धारवाडचे लघुपाटबंधारे खात्यातील साहाय्यक अभियंता देवराज कल्लेश यांचे राजीव गांधीनगर येथील निवासस्थानावर धाड टाकून तपासणी करण्यात आली. तसेच कोटलिंगनगर येथील त्यांच्या आईचे निवासस्थान आणि बेंगेरीजवळील बालाजीनगर येथील सासऱयांच्या निवासस्थानावरही धाड टाकण्यात आली आहे.
धारवाडचे वनखात्यातील एसीएफ यांच्या निवासस्थानांवरही हुबळी-धारवाडच्या एसीबी पथकाने धाडी टाकल्या. त्यांच्याजवळील मालमत्तेसंबंधीची कागदपत्रे ताब्यात घेऊन पडताळणी केली जात आहे. त्यांच्या दोन लॉकरमध्ये 56.5 लाखांची रोकड आणि 400 गॅम सोने-चांदीचे दागिने आढळून आले आहेत.
सहकारी संघांचे संयुक्त निबंधक पांडूरंग गरग यांच्या मालकीचा बेंगळूरच्या विजयनगर येथील बंगला, मल्लेश्वरम येथील कार्यालय, चित्रदुर्ग येथील निवासस्थानासह एकूण पाच ठिकाणी एसीबीने छापा टाकून झडती घेतली. कोलारचे आरोग्य विभागप्रमुख डॉ. विजयकुमार यांचे मुळबागिल येथील घर, खासगी इस्पितळावर तसेच बेंगळूरमधील फ्लॅटवर छापे टाकण्यात आले. बेकायदेशीरपणे कोटय़वधींची मालमत्ता संपादन केल्याचा आरोप झाल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या निवासस्थानी नोटांची बंडले, अनेक पासबूक आढळून आली आहेत.
मंगळूर महानगरपालिकेचे नगर योजना विभागाचे संचालक के. व्ही. जयराज यांच्यावरही बेहिशेबी मालमत्ता संपादनाची तक्रार दाखल झाल्याने त्यांचे निवासस्थान, कार्यालय, नातेवाईकांच्या निवासस्थानांवर मंगळूरच्या एसीबी पथकाने धाड टाकून तपासणी केली. कोप्पळमध्ये किम्सच्या औषध विभागाचे प्रमुख डॉ. श्रीनिवास यांचे घर, कार्यालयावर धाडी टाकण्यात आल्या. बेंगळूरमधील मागडी उपविभागाचे कनिष्ठ अभियंता चन्नबसप्पा अवती यांना देखील एसीबीच्या अधिकाऱयांनी दणका दिला आहे. छाप्यावेळी सर्व ठिकाणी महागडी वाहने, दागदागिने, ऐषोआरामी वस्तू, बेहिशेबी मालमत्तेसंबंधीची कागदपत्रे हाती लागली आहेत.









