ऑनलाईन टीम / हुबळी :
धारवाड जिल्ह्यातील हुबळीमध्ये मंगळवारी रात्री कोरोनाचा पहिला बळी गेला. हुबळी मधील केआयएमएस रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गिरणी चाळ येथील कोरोना बाधित व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, संबधित व्यक्ती मुंबईत रहात होती. लॉक डाऊन शिथिल झाल्यानंतर 21 मे रोजी ती आपल्या परिवारातील चार व्यक्तींसोबत हुबळीमध्ये आली होती. त्यानंतर त्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन करण्यात आले होते. त्या दरम्यान त्यांची कोरोना टेस्ट केली असता चार जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांना केआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती देताना केआयएमएस रुग्णालयाचे वरिष्ठ डॉक्टर म्हणाले, संबंधित व्यक्ती कोणत्याही उपचारांना प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे आम्ही प्लाझ्मा थेरेपी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, वेळेत प्लाझ्मा न मिळाल्याने संबधित व्यक्तीची प्रकृती अधिक खालावली. त्यामुळे आम्ही त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले, मात्र मंगळवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
डेप्युटी कमिशनर दीपा चोलन यांनी सांगितले की, बुधवारी सकाळी आम्ही त्यांचा मृतदेह त्यांच्या परिवाराकडे सोपवला. त्यानंतर त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून त्यांच्यावर अंतिम संस्कार केले.
दरम्यान, धारवाड जिल्ह्यात आता पर्यंत कोरोनाचे 66 रुग्ण आढळले असून त्यातील 39 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर 26 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.









