प्रतिनिधी/ धारबांदोडा
बरकटे धारबांदोडा येथे तब्बल सहा जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. फोंडा पोलीस स्थानकात कार्यरत कर्मचाऱयांच्या संपर्कात आल्यामुळे त्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
बरकटे येथील एक कर्मचारी फोंडा पोलीस स्थानकात कार्यरत आहे. तो सध्या खांडेपार येथे आपल्या कुटुंबासह राहतो. त्याच्या परिवारातील सदस्य कोरोना पोझिटिव्ह सापडले होते. सदर पोलीस कर्मचाऱयाचा भाऊही खांडेपार येथेच राहतो. त्याच्या परिवारातील सदस्यांनाही कोरोना संसर्ग झाल्याचे सांगण्यात आले.
फोंडा येथील पोलीस कर्मचारी बरकटे येथे आपल्या मूळ गावात काही कामानिमित्त येऊन गेला होता. त्यामुळे तेथे दोन रुग्ण सापडले.
सदर कर्मचाऱयाचा भाऊ जरी खांडेपार येथे राहात असला तरी तो ट्रक मालक असल्याने बरकटे व मोले येथे त्याचे ये जा चालूच होते, अशी माहिती प्राप्त झाली असून त्याच्या संपर्कात आलेल्यांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे.
शनिवारी एकूण 36 जणांचे नमुने चाचणीसाठी गोळा करण्यात आले होते. पैकी सहा जण पोझिटिव्ह सापडले आहेत, अशी माहिती पिळये आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. संदेश मडकईकर यांनी दिली आहे. दरम्यान रविवारी बरकटे येथे जंतूनाशक फवारणी करण्यात आल्याचे उपसरपंच सुशांत भगत यांनी सांगितले.









