प्रतिनिधी / धारबांदोडा
धारबांदोडा पंचायत क्षेत्रातील शेटीमळ ढिगणे येथील हेमांगी मराठे यांच्या म्हशीच्या वासराची गोठयात घुसून पडशा पाडल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर घटना काल गुरूवारी सकाळी उघडकीस आली आहे. हेमांगी मराठे यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री बिबटय़ाने गोठय़ात बांधलेल्या वासराची शिकार केली. सकाळी गोठय़ात गेल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला. यानंतर धारबांदोडा येथील वन विभागाच्या कार्यालयात लेखी तक्रार दाखल करण्यात आली. धारबांदोडा विभागाचे फॉरेस्टर गोपाळ जल्मी यानी घटनेचा पंचनामा केला. दरम्यान या परिसरात अनेक गुरे बेपत्ता असून हा बिबटय़ाच गुरांची शिकार करीत असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. या बिबटय़ाचा वन विभागाने त्वरीत बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिकाकडून होत आहे.









