प्रतिनिधी/ धारबांदोडा
मेलका-धारबांदोडा येथे ट्रकखाली सापडून दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला. सुभाष रामचंद्र खुटकर (52, रा. काजूमळ-मोले) असे त्याचे नाव असून गुरुवारी सकाळी 10.45 वा. सुमारास फोंडा-बेळगाव महामार्गावर हा अपघात घडला. मयत सुभाष हा मोले पंचायतीचा माजी पंचसदस्य होता.
कुळे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुभाष हे जीए 12 बी 0668 या क्रमांकाच्या स्कूटरवरुन तांदुळ घेऊन धारबांदोडय़ाहून मोलेच्या दिशेने जात होते. वाटेत मेलका येथे रस्त्य़ावर बसलेल्या गुरांमुळे त्याच्या स्कूटरच्या पुढे असलेला एक टेंपो थांबला. यावेळी पुढे जाण्याच्या प्रयत्नात असताना स्कूटरलवरील त्याचा ताबा सुटला व तो रस्त्यावर कोसळला. दुर्दैवाने याचवेळी समोरुन येण्याऱया एमएच 11 सीएच 5507 या क्रमांकाच्या ट्रकखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. कुळे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. उत्तरीय तपासणीनंतर सायंकाळी काजूमळ मोले येथे शोकाकुळ वातारवणात सुभाषवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्यापश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.
दरम्यान या अपघातामुळे धारबांदोडा ते मोले दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर बसणाऱया गुरांचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. या रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात गुरे रस्ता अडवून बसत असल्याने छोटे मोठे अपघात घडत आहेत.









