‘वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन साईट’ म्हणून निवड : ऑस्ट्रेलियात झाली पुरस्काराची घोषणा
प्रतिनिधी / मालवण:
प्राचीन धामापूर तलावाचे वैभव अणि संस्कृती संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी गेली अनेक वर्षे धामापूर येथील स्यमंतक संस्था जीवन शिक्षण विद्यापीठ प्रयत्न करीत आहे. त्यासाठी धामापूर गावाच्या जैविक संपदेचे डॉक्युमेंटेशन आणि त्या संबंधी प्रशासकीय व्यवस्था आणि तज्ञ मंडळी यांच्याशी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. शनिवारी सकाळी दिल्लीहून एका वरिष्ठ अधिकाऱयाचा स्यमंतक संस्थेला फोन आला आणि त्यांनी या परिश्रमाची पोचपावतीच जणू दिली. इंटरनॅशनल कमिशन ऑन इरिगेशन ऍण्ड ड्रेनेज (आयसीआयडी) द्वारे धामापूर तलावाची ‘वर्ल्ड हेरिटेज इरीगेशन साईट’ साठी निवड केली गेली आहे. महाराष्ट्र राज्याला हा पुरस्कार पहिल्यांदाच मिळाला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हय़ाचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरात नोंदवले जाईल.
2018 साली ‘आयसीआयडी’च्या कॅनडा येथे झालेल्या 69 व्या आंतरराष्ट्रीय कार्यकारी परिषदमध्ये भारताला पहिल्यांदा सदरमट्ट आनीकट्ट आणि पेड्डा चेरुवू या तेलंगणा राज्यातील दोन साईट्सना ‘वर्ल्ड हेरिटेज इरीगेशन साईट’ म्हणून पुरस्कृत केले गेले होते. सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथे होणाऱया 2020 सालच्या 72 व्या आंतरराष्ट्रीय परिषदमध्ये जगातील चौदा साईट्सना वर्ल्ड हेरिटेज इरीगेशन साईट म्हणून पुरस्कृत केले जाणार आहे. पैकी भारतातील आंध्रप्रदेशमधील ‘कुंबम तलाव’ (1706), ‘के. सी कॅनल’ (सन 1863), ‘पोरुममीला टॅंक’ (1896) आणि महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हय़ातील धामापूर तलाव (सन 1530) यांना हा मान प्राप्त होणार आहे.
ही एक सुरुवात आहे. अशा अनेक गोष्टी या सिंधुदुर्ग जिल्हय़ामध्ये शाश्वत राहणीमान आणि पर्यटन यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. सिंधुदुर्ग हे एक युनिक टुरिझम म्हणून महत्वाचे स्थान आहे. परंतु आज त्याची अवस्था ट्रेनच्या जनरल कंपार्टमेंटसारखी झाली आहे. जो तो फक्त पैसे कमावण्यासाठी काहीही व कसाही व्यवसाय करीत आहे. आपल्या जैविक संपदा, हेरिटेज साईट्स राखून, त्यांचा अभ्यास करून, साधे पण एक उच्च दर्जाचे जीवन आपण सिंधुदुर्ग जिल्हय़ात जगू शकतो. या गोष्टींची आठवण राहावी आणि आपले हे समृद्ध जीवन अभ्यासण्यासाठी, अनुभवण्यासाठी जगभरातून अभ्यासूंनी सिंधुदुर्गमध्ये यावे, यासाठी एक छोटेसे पाऊल स्यमंतकतर्फे उचलण्यात येत आहे. त्या अनुषंगाने लवकरच ‘मी धामापूर तलाव बोलत आहे!’ ही डॉक्युमेंटरी रिलिज केली जाणार आहे, असेही या निमित्ताने स्पष्ट करण्यात आले.









