महिन्याभरात 80 हजार पर्यटकांची भेट : हिरवाई घालतेय साद, पदभ्रमंतीची पर्यटकांना भुरळ
प्रतिनिधी /बेळगाव
धामणे (एस) येथील वनक्षेत्रात सुरू झालेल्या टेकिंगला पर्यटकांचा प्रतिसाद वाढला आहे. महिन्याभरात 80 हजार पर्यटकांनी जंगल सफारी केली आहे. यामधून वनविभागाला तब्बल 2 लाखाचा महसूल मिळाला आहे. त्यामुळे वनविभागाचा धामणे येथील जंगल सफारीचा उपक्रम लाभदायक ठरला आहे.
वनविभागाने धामणे येथील वनक्षेत्रात फेब्रुवारीपासून टेकिंग सुरू केले आहे. येथील जंगलात टेकिंगसाठी सुविधा उपलब्ध करून दोन किलोमीटर आणि पाच किलोमीटर असे दोन ट्रक उपलब्ध केले आहेत. वनक्षेत्रात उंचावरून कोसळणारे धबधबे, हिरवाईने नटलेली झाडे, बारमाही वाहणारे नाले आणि जैवविविधतेमुळे पर्यटकांचा ओघ वाढला आहे. त्यामुळे महिन्याभरात वनविभागाला चांगला महसूल प्राप्त झाला आहे.
जंगल सफारीसाठी बेळगाव, खानापूर, चंदगड यासह कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि गोव्यातूनदेखील पर्यटक दाखल होत आहेत. जंगल सफारीदरम्यान वनक्षेत्रातील जैवविविधतेबरोबर हत्ती, हरिण, कोल्हे, बिबटे, मोर, जंगली डुक्कर, तरस, साळींदर या वन्यप्राण्यांचेदेखील काहीवेळा दर्शन होत आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षांत निसर्गप्रेमी आणि पर्यटकांना बाहेर पडता आले नाही. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्यानंतर निसर्गप्रेमींची पावले निसर्गाकडे वळताना दिसत आहे.
टेकिंग दरम्यान पर्यटकांना विविध प्रजातीबरोबर पशु-पक्ष्यांचे आवाजदेखील कानावर पडत आहेत. दरम्यान निसर्गसंपदेचा अभ्यास करणाऱया निसर्गप्रेमींची संख्याही अधिक आहे. विविध भागातून निसर्गाचा अभ्यास करणारे व्यक्ती दाखल होत आहेत. त्यामुळे पर्यटकांचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या पर्यटकांमुळे पहिल्याच महिन्यात अधिक महसूल मिळाला आहे. त्यामुळे येत्या काळात महसुलात पुन्हा वाढ होईल, अशी आशा वनविभागाला आहे.
पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांचे टेकिंग सोयिस्कर होत आहे. प्रत्येक पर्यटकांसाठी 250 रुपये शुल्क आकारणी केली जात आहे. विशेषतः शनिवार-रविवार व सुटीच्या दिवशी पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शनिवार-रविवारी उत्पन्न वाढत आहे.
शैक्षणिक सहलींना प्रारंभ झाल्यास पर्यटकांची संख्या वाढणार
नागरिकांना वनक्षेत्रात निसर्गाचा आनंद लुटता यावा आणि प्रत्यक्ष जंगल पाहता यावे, याकरिता खात्याने जंगल सफारी सुरू केली आहे. जंगल सफारीबरोबर जवळ असलेल्या तिलारी डॅमचेही दर्शन घेता येत आहे. शाळा-महाविद्यालयांच्या शैक्षणिक सहलींना प्रारंभ झाल्यानंतर पर्यटकांची संख्या अधिक वाढणार आहे.
कुटुंबासोबत येणाऱया पर्यटकांची संख्या अधिक
– शिवानंद मगदूम (आरएफओ वनविभाग)
टेकिंगला सुरू केलेल्या पहिल्या महिन्यातच पर्यटकांचा प्रतिसाद उत्तम मिळाला आहे. त्यामुळे महसूलही अधिक जमा झाला आहे. याबरोबर वनक्षेत्रात पर्यटकांसाठी विविध सुविधा पुरविल्या जाणाऱया आहेत. जंगलात फिरायला मिळत असल्याने निसर्गप्रेमींबरोबर कुटुंबासोबत येणाऱया पर्यटकांची संख्या अधिक आहे.









