कोरोनाग्रस्त वृद्धामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण
वार्ताहर / धामणे
धामणे येथील 75 वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाल्याने गावात भीतीचे वातवरण पसरले आहे.
धामणे बसवाण गल्ली येथील 75 वर्षीय वृद्धाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने शनिवार दि. 4 रोजी सकाळी 10 च्या सुमारास येळ्ळूर उपआरोग्य केंद्रातील डॉ. आर. बी. दडगी, डॉ. मारिहाळ आणि डॉ. सुधा कुलीकट्टी व धामणे येथील आशा कर्मचारी आणि ग्रा. पं. सदस्य बसवाण गल्लीत ऍम्ब्युलन्ससहित दाखल झाले. त्यांनी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या वृद्धाच्या घरी चौकशी करून त्याला जिल्हा रुग्णालयात नेले. ही वार्ता गावभर आणि परिसरात वाऱयासारखी पसरली. त्यामुळे धामणे गावात भीतीचे वातवरण पसरले आहे. येथे पॉझिटिव्ह आलेल्या वृद्धाच्या घरातील दोन महिला, एक पुरुष व दोन मुलांना गावच्या शेजारी असलेल्या मराठी शाळेत क्वारंटाईन करण्यात आले आहे.
या रुग्णाच्या घरी परवाच पडल्या भरण्याचा कार्यक्रम झाला होता. याप्रसंगी उपस्थित असलेल्या नातेवाईकांनाही त्यांच्या गावी क्वारंटाईन ठेवल्याचे कळते.









