बेळगाव : धामणे एस. येथील धरणाचे दरवाजे खेचणाऱया सुमारे 25 फूट उंच मशीनमध्ये गेले दोन दिवस किंग कोब्रा ठाण मांडून बसला होता. सुमारे 10 फूट लांबीच्या या सर्पाला मोठय़ा धाडसाने सर्पमित्र आनंद चिठ्ठी यांनी पकडले.
येथील वनरक्षक राहुल बोंगळे यांना हा सर्प धरणाचे दरवाजे खेचायच्या 25 फूट उंच असलेल्या मशीनमध्ये दृष्टीस पडला. दोन दिवस तो तेथेच ठाण मांडून होता. ही बाब वरिष्ठ अधिकारी रमेश यांना कळविण्यात आली. या सर्पाला या कठीण ठिकाणाहून सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी सर्पमित्र आनंद चिठ्ठी यांना पाचारण केले. चिठ्ठी यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन 25 फूट उंचावर थांबायलाही जागा नसलेल्या ठिकाणी एकटय़ाने धोका पत्करून 10 फूट लांबीच्या किंग कोब्राला पकडले.
सापडलेला किंग कोब्रा 9 फूट 8 इंच आणि 8 किलो वजनाचा नर जातीचा असून या परिसरात हा प्रथमच आढळल्याचे सर्पमित्र आनंद चिठ्ठी यांनी यावेळी सांगितले. वनविभागाच्या सहकार्याने या सर्पाला तात्काळ सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले.









