मार्च अर्थसंकल्पिय अधिवेशनात निधीची तरतुद
म्हासुर्ली / वार्ताहर
राधानगरी,पन्हाळा व गगनबावडा तालुक्यात विस्तारलेल्या धामणी खोऱ्यातील शेकडो हेक्टर जमीन ओलीताखाली येण्यासाठी महत्वपुर्ण ठरणाऱ्या राई (ता.राधानगरी) येथील धामणी मध्यम प्रकल्पाकरीता सध्या सुरु असलेल्या मार्च अर्थसंकल्पिय अधिवेशनामध्ये १०० कोटी रुपयांची भरीव निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
अनेक कारणांनी गेल्या वीस वर्षापासून धामणी मध्यम प्रकल्पाचे काम रखडले आहे. मात्र प्रकल्पाचे काम सुरु करण्याकरिता शासनस्तरावर केलेल्या पाठपुराव्यामुळे प्रकल्पास ७८२ कोटी रुपयांची सुधारित प्रशासक्रिय मान्यता घेण्यात यश आले होते. परंतु जुन्या ठेकेदाराचे पूर्वी झालेल्या कामाचे देणे असल्यामुळे निविदा प्रसिध्द करण्यास अडथळे निर्माण झाले होते. तसेच सदर ठेकेदार न्यायालयात गेल्यामुळे निविदा काढण्यात अडचण निर्माण झाली होती. मात्र शासनाच्या जलसंपदा विभागाने न्यायालयामध्ये शासनाच्या वतीने प्रतिज्ञापत्र सादर करत जुन्या ठेकेदाराचे ५५ कोटी रुपयांचे थकबाकीबाकी अदा केली आहे.
परंतू गेल्या वर्षभरामध्ये देशभर कोरोना महामारीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याने सर्वच विकासकामे ठप्प झाली होती. परिणामी या सर्वांचा फटका धामणी प्रकल्पाचे काम सुरु करण्यासही बसला होता. मात्र नोव्हेंबर पासून राज्यातील लॉकडाऊन उठल्यामुळे बहुतांशी कामे सुरु झाली आहे. त्यातच धामणी प्रकल्पास निधी देण्याबाबत आमदार प्रकाश अबिटकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांचेकडे सततचा पाठपुरावा करत मागणी केली होती. तर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी धामणी प्रकल्पाबाबत येत्या अर्थसंकल्पिय अधिवेशामध्ये भरीव निधीची तरतूद करणार असल्याचा शब्द दिला होता.
त्याप्रमाणे आज विधानसभेमध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये धामणी मध्यम प्रकल्पासाठी १०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात केल्याची घोषणा करण्यात आहे. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेला प्रकल्प लागणार आहे. त्याबरोबरच प्रकल्पाची निधी प्रसिध्द करण्याची प्रक्रियाही अंतिम टप्यामध्ये असून याबाबत जलपंदा विभागाचे मुख्य अभियंता यांचेकडेही याबाबत सततचा पाठपुरावा सुरु असून लवकरच प्रकल्पाची निविदा प्रसिध्द होवून धामणी प्रकल्पाचे काम सुरु करणार असल्याचे आमदार प्रकाश अबिटकर यांनी तरुण भारत बोलताना सांगितले.
इतर प्रकल्पांनाही भरीव निधी
याबरोबरच अर्थसंकल्पिय अधिवेशामध्ये कोल्हापूर जिल्हयातील धामणी मध्यम प्रकल्पासह दुधगंगा आंतरराज्य प्रकल्पाकरीता ४० कोटी, सर्फनाला प्रकल्प ३० कोटी, नागणवाडी ल.पा.प्रकल्पाकरीता १०, उचंगी प्रकल्प १० कोटी, आंबेआहोळ प्रकल्प १०.१० कोटी रुपयांचा भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे जिल्हयातील निधी अभावी रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये पुर्णत्वाकडे जाण्यास मदत होणार असुन जिल्यातील सिंचन प्रकल्पांना भरीव निधीची तरतूद केल्याबददल राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे आभार व्यक्त करत असल्याचे आमदार प्रकाश अबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे म्हटले आहे.