अहमदाबाद / वृत्तसंस्था
शिखर धवन उर्फ गब्बरच्या बॅटीतून 47 चेंडूत 69 धावांची आतषबाजी झाल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल साखळी सामन्यात पंजाब किंग्सचा 7 गडी राखून फडशा पाडला आणि मोसमातील 6 व्या विजयासह गुणतालिकेत अव्वलस्थानावरही कब्जा केला. प्रारंभी, पंजाबने 6 बाद 166 धावा केल्यानंतर दिल्लीने देखील तोडीस तोड उत्तर देत 17.4 षटकात 3 गडय़ांच्या बदल्यातच विजयाचे लक्ष्य गाठले. पंजाबच्या डावात 58 चेंडूत 99 धावांची आतषबाजी करणारा मयांक अगरवाल सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
167 धावांचे आव्हान असताना धवन व शॉ (22 चेंडूत 39) यांनी 6.1 षटकात 63 धावांची भरभक्कम सलामी दिली. त्यानंतर धवनने स्टीव्ह स्मिथसमवेत (25 चेंडूत 25) दुसऱया गडय़ासाठी 48 धावांची तर रिषभ पंतसमवेत तिसऱया गडय़ासाठी 36 धावांची भागीदारी साकारली. स्मिथ, पंत बाद झाल्यानंतर धवनने हेतमेयरसह विजयावर शिक्कामोर्तब करुन दिले. हेतमेयरने जलद फटकेबाजी करताना 4 चेंडूत 1 चौकार, 2 षटकारांसह नाबाद 16 धावा फटकावल्या.
मयांक शतकापासून वंचित
हंगामी कर्णधार मयांक अगरवालने अवघ्या 58 चेंडूत 99 धावांची आतषबाजी केल्यानंतर पंजाब किंग्सने 20 षटकात 6 बाद 166 धावांपर्यंत मजल मारली. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर अगरवाल व पदार्पणवीर डेव्हिड मलान (26) यांनी तिसऱया गडय़ासाठी 52 धावांची भागीदारी साकारली. बेंगळूरच्या 30 वर्षीय मयांकची फटकेबाजी पंजाबसाठी विशेष महत्त्वाची ठरली. मयांकने चौफेर फटकेबाजी करताना 8 चौकार व 4 षटकार वसूल केले. त्याचा स्ट्राईक रेटही 170.68 असा लक्षवेधी राहिला.
रबाडाने डावातील तिसऱया षटकात प्रभसिमरनला 12 धावांवर बाद करत पंजाबला पहिला धक्का दिला. त्यानंतर ठरावीक अंतराने पंजाबचे फलंदाज बाद होण्याचा जणू सिलसिलाच सुरु झाला. प्रभसिमरनने आऊटसाईड ऑफ स्टम्पवरील चेंडूवर आक्रमक फटका मारण्याच्या प्रयत्नात मिडऑफवरील स्मिथकडे सोपा झेल दिला. ख्रिस गेलने 1 चौकार व 1 षटकारासह फ्लाईंग स्टार्ट काय असतो, हे दाखवून दिले होते. पण, रबाडाच्या प्रतितास 144 किमी वेगाने यष्टीवर आदळलेल्या फुलटॉसचा अंदाजच आला नाही आणि ख्रिस गेलचा शब्दशः त्रिफळा उडाला.
अष्टपैलू अक्षर पटेलने डेव्हिड मलानचा अडथळा सहज दूर सारला. चेंडूमागे 1 धाव या समीकरणाने फलंदाजी करणाऱया मलानने 26 धावा केल्या. अक्षरने त्रिफळा उडवत त्याची खेळी संपुष्टात आणली. अक्षरनेच दीपक हुडाला देखील धावचीत करण्यात मोलाचा वाटा उचलला. मात्र, हुडाचे धावचीत होणे बरेच नाटय़मय ठरले. डावातील 18 व्या षटकात शाहरुख खानने अवेशच्या गोलंदाजीवर एक्स्ट्रा कव्हरवरील हेतमेयरकडे झेल दिला.
धावफलक
पंजाब किंग्स ः प्रभसिमरन सिंग झे. स्मिथ, गो. रबाडा 12 (16 चेंडूत 1 षटकार), मयांक अगरवाल नाबाद 99 (58 चेंडूत 8 चौकार, 4 षटकार), ख्रिस गेल त्रि. गो. रबाडा 13 (9 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), डेव्हिड मलान त्रि. गो. पटेल 26 (26 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), दीपक हुडा धावचीत (हेतमेयर-पटेल) 1 (1 चेंडू), शाहरुख खान झे. हेतमेयर, गो. अवेश 4 (5 चेंडू), ख्रिस जॉर्डन झे. ललित, गो. रबाडा 2 (3 चेंडू), हरप्रीत ब्रार नाबाद 4 (2 चेंडूत 1 चौकार). अवांतर 5. एकूण 6 बाद 166.
गडी बाद होण्याचा क्रम
1-17 (प्रभसिमरन, 3.3), 2-35 (ख्रिस गेल, 5.2), 3-87 (मलान, 13.1), 4-88 (दीपक हुडा, 13.3), 5-129 (शाहरुख, 17.2), 6-143 (जॉर्डन, 18.6).
गोलंदाजी
इशांत शर्मा 4-1-37-0, स्टोईनिस 1-0-6-0, रबाडा 4-0-36-3, अवेश खान 4-0-39-1, ललित यादव 3-0-25-0, अक्षर पटेल 4-0-21-1.
दिल्ली कॅपिटल्स ः पृथ्वी शॉ त्रि. गो. हरप्रीत 39 (22 चेंडूत 3 चौकार, 3 षटकार), शिखर धवन नाबाद 69 (47 चेंडूत 6 चौकार, 2 षटकार), स्टीव्ह स्मिथ झे. मलान, गो. मेरेडिथ 25 (22 चेंडूत 1 चौकार), रिषभ पंत झे. अगरवाल, गो. जॉर्डन 14 (11 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), शिमरॉन हेतमेयर नाबाद 16 (4 चेंडूत 1 चौकार, 2 षटकार). अवांतर 5. एकूण 17.4 षटकात 3 बाद 167.
गडी बाद होण्याचा क्रम
1-63 (शॉ, 6.1), 2-111 (स्टीव्ह स्मिथ, 12.6), 3-147 (रिषभ, 16.3).
गोलंदाजी
रिले मेरेडिथ 3.4-0-35-1, मोहम्मद शमी 3-0-37-0, रवी बिश्नोई 4-0-42-0, ख्रिस जॉर्डन 2-0-21-1 हरप्रीत ब्रार 3-0-19-1, दीपक हुडा 2-0-11-0.
दोन्ही फलंदाज एकाच क्रीझकडे धावले….तरीही दोघेही ‘धावबाद’ झाले!
पंजाब किंग्सच्या डावात 14 व्या षटकात अतिशय नाटय़मय घटना घडली. अक्षर पटेलच्या षटकातील तिसऱया चेंडूवर मयांकने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका खेळला आणि एकेरी धावेसाठी कॉल दिला. हुडाला यावेळी धाव अपेक्षित नव्हती. पण, तो ही पुढे धावला. यानंतर आश्चर्य म्हणजे धाव पूर्ण करण्याच्या प्रयत्नातील मयांक व धाव नको असल्याने परतणारा हुडा हे दोघेही एकाच एण्डकडे धावले आणि तोवर हेतमेयरने चेंडू कलेक्ट करुन सुपूर्द केल्यानंतर अक्षर पटेलने यष्टी उद्ध्वस्त केली. आणखी आश्चर्य म्हणजे अक्षरने नॉन स्ट्रायकर एण्डकडील यष्टी उद्ध्वस्त केली, त्यावेळी हे दोन्ही फलंदाज एकाच बाजूने येत असूनही वेळेत क्रीझमध्ये पोहोचू शकले नाहीत. त्यानंतर अक्षरने समयसूचकता दाखवत यष्टीरक्षक पंतकडे चेंडू सोपवला, तेथे त्यानेही उद्ध्वस्त केली. हुडा क्रीझकडे परतत असल्याचे रिप्लेत दिसून आल्याने त्याला धावबाद घोषित केले गेले.









