काँग्रेस-निजदचा विधेयकाला विरोध
प्रतिनिधी/ बेळगाव
मंगळवारी विधानसभेत सरकारी धर्मांतर बंदी विधेयक मांडले आहे. या विधेयकावर बुधवारी वादळी चर्चा होणार, अशी अपेक्षा होती. मात्र, ही चर्चा आता गुरुवारी होणार आहे. गुरुवारी या विधेयकावरील चर्चेसाठी प्रश्नोत्तराचा तासही बदलण्यात आला आहे. यासाठी अधिवेशन एक तास आधी भरविण्यात येत आहे.
भोजन विरामानंतर सभाध्यक्ष विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी 5 पर्यंत उत्तर कर्नाटकातील प्रमुख पाणी योजनांवर चर्चा करा व 5 ते 6 यावेळेत धर्मांतर बंदी विधेयकावर चर्चेला मुभा देण्यात येईल, असे जाहीर केले. यावर प्रामुख्याने कोणती चर्चा घ्यायची? या विषयावर अनेक नेत्यांनी वेगवेगळी मते मांडली.
दोन प्रमुख मुद्दय़ांवर चर्चा करताना वेळेचे बंधन नको. एकतर उत्तर कर्नाटकातील पाणी योजनांवर चर्चा करा, नाही तर विधेयकावर चर्चा करा, अशी मागणी विरोधी पक्षातील आमदारांनी केली. मुदतवाढच हवी असेल तर सायंकाळी 7 वाजेपर्यंत चर्चेची आपली तयारी आहे, असे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी सांगताच यापेक्षा आणखी आठ दिवस अधिवेशन चालवा, त्यामुळे सविस्तर चर्चा करता येईल, अशी मागणी केली.
सत्ताधारी व विरोधी पक्षातील आमदारांकडून वेगवेगळी मते मांडली जात असतानाच सभाध्यक्ष विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी बुधवारी पूर्णपणे उत्तर कर्नाटकातील मुद्दय़ांवर चर्चा करू, गुरुवारी सकाळी नेहमीपेक्षा एक तास आधी अधिवेशनाला सुरुवात करू. सुरुवातीला धर्मांतर बंदी कायद्यावर चर्चा असेल, असे त्यांनी सांगितले.









