प्रतिनिधी/ बेळगाव
धर्मवीर संभाजी महाराज चौकातील संभाजी महाराज पुतळय़ाच्या सभोवती बुरुज व कमान उभारण्यात येणार आहे. परिसराचा विकास व सुशोभिकरण करण्यात येणार आहे. याकरिता 32 लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून पुतळय़ाच्या परिसराच्या विकासाचे काम प्रगतिपथावर सुरू आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विविध चौकांचा विकास करण्यात येणार आहे. मात्र, धर्मवीर संभाजी चौकातील पुतळय़ाच्या परिसराचा विकास महापालिकेच्यावतीने करण्याचे काम मागील 3 वर्षांपासून सुरू आहे. उपलब्ध निधीअंतर्गत पुतळय़ाच्या सभोवती भिंत बांधून सुशोभिकरण करण्यात आले होते. पुतळय़ाच्या मागील बाजूच्या भिंतीचा व कमानीचा आराखडा तयार करून निधीच्या मंजुरीसाठी महापालिकेकडे प्रस्ताव देण्यात आला होता. याकरिता माजी महापौर सरिता पाटील यांनी महापालिकेकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळे दुसऱया टप्प्यात याकरिता 12 लाखाचा निधी एसएफसी अनुदानांतर्गत मंजूर करण्यात आला होता. विविध कारणांमुळे हे काम मार्गी लागले नव्हते. मात्र, सदर पुतळय़ाच्या सुशोभिकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी आमदार अनिल बेनके यांनीही निधी मंजूर केला आहे. त्यामुळे उर्वरित अनुदान आमदार फंडातून मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्तीच्या मागील बाजूस किल्ल्याप्रमाणे बुरुज बनविण्यात येणार आहे. कमान उभारण्यात येणार आहे. या परिसराच्या सुशोभिकरणासाठी 32 लाखांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सदर काम प्रगतिपथावर असून, मूर्तीच्या मागील बाजूस भिंत उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच हा परिसर आकर्षक होणार आहे.









