प्रतिनिधी/ बेळगाव
धर्मवीर संभाजी चौकामध्ये असणाऱया वडगाव बसथांब्याच्या दोन्ही बाजूला असलेली झाडे जीर्ण झाली असून ती कधीही कोसळण्याच्या स्थितीत आहेत. स्मार्ट सिटीचे काम सुरू असताना या ठिकाणी सतत खोदाई करण्यात आली. धर्मवीर संभाजी चौकातील बसथांब्याचे काम तीनवेळा सुरू करून बंद करण्यात आले आहे.
सध्या येथे पेव्हर्स घालण्यात आले आहेत. पण बसथांब्याची दुरवस्था झाली आहे. याच ठिकाणी असणारी दोन झाडे पूर्णतः वाळून गेली असून ती कधीही कोसळू शकतात, अशी स्थिती आहे. लॉकडाऊनमुळे सध्या येथे प्रवासी नाहीत, ही सुदैवाची बाब आहे.
मात्र याच काळात ही धोकादायक झाडे हटविण्याची तत्परता महानगरपालिका व वनखात्याने घेणे आवश्यक आहे. वर्दळ सुरू होऊन प्रवाशांची संख्या वाढल्यास झाडांमुळे अनर्थ होऊ शकतो. त्यामुळे ही झाडे वेळीच हटविणे आवश्यक बनले आहे.









