प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर चर्च कौन्सिलच्या मालकीच्या खोलीमध्ये नाष्टा सेंटर सुरू करण्यास परवानगी नाकारल्याच्या रागातून स्मिता सॅम्युअल बेडेकर (रा.रविवार पेठ, कोल्हापूर) या महिलेने २४ फेब्रुवारी २०२० रोजी कानान नगर येथे चर्च कौन्सिलच्या आवारात धर्मगुरू जगन्नाथ हिरवे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची कबुली दिल्यानंतर तिला शहर पोलीस उप अधिक्षक प्रेरणा कट्टे यांनी अटक केली आहे. तब्बल एक महिन्यानंतर या प्रकरणाचा तपास करण्यात पोलिस यंत्रणेला यश आले आहे. या घटनेने पश्चिम महाराष्ट्रातील खिश्चन समाज हादरून गेला होता.
याबाबतची सविस्तर हकीकत अशी,कोल्हापूर चर्च कौन्सिलचे कार्यकारी चिटणीस व धर्मगुरू जगन्नाथ सखाराम हिरवे यांच्यावर २४ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास कनान नगर येथे प्राणघातक हल्ला झाला होता. या हल्यानंतर अंधाराचा फायदा घेत हल्लेखोराने पलायन केले होते. गळ्यावर वर्मी वार झाल्याने धर्मगुरू हिरवे हे गंभीर जखमी झाले होते. हल्ल्याच्या घटनेनंतर हिरवे यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेमुळे कोल्हापुरातील ख्रिश्चन समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. धर्मगुरू सारख्या व्यक्तीवर प्राणघातक हल्ला झाल्यामुळे ख्रिश्चन समाजामध्ये हल्लेखोरा विरोधात प्रचंड राग निर्माण झाला होता.
या हल्ल्याबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्यात अज्ञात महिले विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. या घटनेबाबत गांभीर्याने घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे व शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके स्थापन करून तात्काळ तपासाला सुरुवात झाली होती. एक महिना उलटला तरी या गुन्ह्यातील संशयित आरोपी पर्यंत पोलिसांना पोहोचता आले नव्हते.
दरम्यान, शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला एका गोपनीय बातमीदारा मार्फत रविवार पेठेत राहणाऱ्या स्मिता सॅम्युअल बेडेकर या महिलेविषयी गोपनीय माहिती मिळाली. त्या अनुषंगाने संबंधित महिलेला ताब्यात घेऊन पोलिस उपाधीक्षक प्रेरणा कट्टे व पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड त्यांनी तिच्याकडे सविस्तर चौकशी केली. प्रारंभी तिने या गुन्ह्याची आपला कोणताही संबंध नसल्याचे दाखवले. मात्र अधिक चौकशीमध्ये तिने या गुन्ह्याबाबत माहिती उघड केली.
कोल्हापूर चर्च कौन्सिलच्या मालकीच्या खोलीमध्ये राहत्या घराच्या जागेमध्ये स्मिता बेडेकर हिने नाष्टा सेंटर सुरू केले होते. त्याला चर्चा कौन्सिलने हरकत घेतली होती. तिथे नाष्टा सेंटर चालू करण्यासाठी बेडेकर हिने वारंवार कौन्सिलकडे परवानगी मागितली होती. पण ही परवानगी नाकारण्यात आली. या रागातून तिने धर्मगुरू हिरवे यांचा काटा काढण्याचे ठरवले होते. २४ फेब्रुवारी रोजी स्मिता बेडेकर ही तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत टेंबलाईवाडी येथे गेली होती. तेथे तिने मद्यप्राशन केले.त्यानंतर तेथून मित्राच्या रिक्षातून नागाळा पार्क येथे ती गेली होती. मित्राला नागाळा पार्क कमानीजवळ थांबवून मी लगेच येतो असे सांगून ती एकटीच चर्च कौन्सिलच्या कार्यालयाकडे चालत गेली. तेथे कार्यालयाबाहेर गाडीमध्ये बसलेल्या धर्मगुरू जगन्नाथ हिरवे यांच्यावर स्वतःकडील पर्समधील ब्लेड काढून गळ्यावर वार केल्यानंतर तिने पळ काढल्याची कबुली अधिक तपासात दिली. याप्रकरणी पोलिसांनी तिला अटक केली आहे.
या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कटकधोंड, सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कोरके साहेब फौजदार प्रकाश भंडारे यांच्यासह गुन्हे शोध पथक व शहर पोलिस अधीक्षक कार्यालयातील विशेष पथकातील वनिता घाडगे, निशा कांबळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केला.
Previous Articleमृतदेहाला तब्बल २२ तासाने ग्रामसेवकांनी दिला भडाग्नी
Next Article नेसरीत दुचाकी व चारचाकी वाहनांवर कारवाई









