प्रतिनिधी/ पणजी
पुनो वेळीप गावकर मारहाण व धमकी प्रकरण हे माझी प्रतिमा खराब करण्याचा तसेच मला सामाजिक व राजकीयदृष्टय़ा बदनाम करण्याचे स्थानिकांनी केलेले षड्यंत्र आहे. प्रथम न्यायदंडाधिकारी न्यायालयाने देण्यात आलेल्या निर्णयावर स्थगिती मिळाली असून येत्या एका महिन्याच्याआत उच्च न्यायालयात याविषयी दाद मागणार आहे. तसेच तक्रारदार व जे लोक या षड्यंत्रात सामील आहेत त्यांचा लवकरच पर्दाफाश करणार असल्याचा दावा माजी क्रीडामंत्री आणि अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे अध्यक्ष रमेश तवडकर यांनी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत केला.
2017 च्या निवडणूकीपूर्वी सदर प्रकरण नोंद झाले होते आणि या प्रकरणाचा निकाल बुधवारी लागला. शिक्षा म्हणून तक्रारदाराला दहा हजार रूपये नुकसानभरपाई देणे आणि न्यायालयाचे कामकाज संपेपर्यंत मी न्यायालयात बसावे असा निर्णय देण्यात आला आहे. परंतु हा निर्णय मला मान्य नसल्याने मी या निर्णयावर स्थगिती मागितली आणि मला ती मिळाली. त्यामुळे यावर एका महिन्याच्याआत उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. शिक्षेवरून या प्रकरणाचे वजन किती आहे ते दिसून येते. खरे म्हणजे हे प्रकरण अदखलपात्र होते. असे असताना राजकीय दृष्टिकोनातून मला बदनाम करण्याचा तसेच सामाजिक व राजकीय कार्यावर कलंक लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तक्रारदाराला मी स्पर्शसुद्धा केलेला नाही. पुनो वेळीप गावकर हा सामान्य माणूस आहे. त्याला भडकावून हे षड्यंत्र रचण्यात आले आहे. या प्रकरणाचा पूर्ण पाठपुरावा करणार आणि तक्रारदारावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याची माहिती रमेश तवडकर यांनी यावेळी दिली.









