आज धनत्रयोदशीचा सण असून सोन्याचांदीच्या खरेदी-विक्रीला चांगला दिवस समजला जातो. दिवाळी सणाच्या पूर्वी येणारा धनत्रयोदशीचा दिवस भारत सरकारने ख‘राष्ट्रीय आयुर्वेद दिन’ म्हणून 2016 पासून साजरा करण्यास प्रारंभ केला तो देवांचा वैद्य धन्वंतरीची जयंती म्हणूनच. देवदानवांनी जेव्हा सागरमंथन केले तेव्हा त्यातून चौदा रत्ने प्राप्त झाली. त्यात धन्वंतरीचा समावेश होतो. भगवान श्रीविष्णूचा अवतार म्हणून ज्याला मान्यता लाभली त्या धन्वंतरीने भारतीय लोकमानसाला आयुर्वेदातील ज्ञान देण्याची महत्त्वाची कामगिरी बजावली होती. आयुर्वेद ही भारताने जगाला प्रदान केलेली विशेष महत्त्वाची देणगी असून, आयुर्वेदाची परंपरा समृद्ध करण्यात धन्वंतरीचे महत्त्वाचे योगदान आहे. त्याच्याच अलौकिक प्रतिभेद्वारे विविध औषधींचे सार अमृताच्या रूपाने देवांना प्राप्त झाले आणि ते जरामृत्यूरहित झाले आणि त्यामुळे समस्त देवादिकांनी त्यांना वैद्यराजपद बहाल केले असे मानले जाते. धन्वंतरीने चिकित्सेचे ज्ञान भास्करापासून साध्य केले आणि त्या ज्ञानाद्वारे त्यांनी चिकित्सातत्त्व विज्ञानतंत्र हा ग्रंथ रचल्याचे सांगितले जाते.
श्रीविष्णूचे जे चोवीस अवतार मानले जातात, त्यात धन्वंतरीचा समावेश होतो आणि त्यामुळे वैष्णव मूर्तिसंभारात धन्वंतरीच्या मूर्तीला स्थान लाभलेले आहे. धन्वंतरीची मूर्ती तेजस्वी व चतुर्भुज असून, त्याने पीतवस्त्र धारण केलेले असून, त्याचा एक हात अभय मुद्रेत तर उरलेल्या हातात कमळ, अमृतघट व शल्ययंत्र धारण केलेले दाखवलेले आहे. काही ठिकाणी त्याच्या मूर्तीतल्या हातात शंख, चक्र, अमृतघट आणि जळू धारण केल्याचे दाखवलेले आहे. धन्वंतरीला आदिदेव, अमृतयोगी, सुधापाणी, अमरवर अशी नावे लाभलेली आहेत. पुराणकाळातील धन्वंतरी हा ‘देवांचा वैद्य’ मानलेला असून, त्यानंतरही आयुर्वेदाच्या ज्ञानक्षेत्रात ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली त्यांना धन्वंतरीचे पुनरावतार मानलेले आहे. काशी नगरीत जन्माला आलेला वैद्य हा आयुर्वेदाचा प्रवर्तक मानलेला असून त्याने भारद्वाज ऋषींकडून आयुर्वेद ज्ञानाची प्राप्ती करून ते ज्ञान आपल्या शिष्यांना प्रदान केले. चिकित्सादर्शन, चिकित्साकौमुदी, योगचिंतामणी, विद्याप्रकाश चिकित्सा आदी ग्रंथांचा कर्ता म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. त्यांनी लिहिलेला ‘धन्वंतरीनघंटू’ हा ग्रंथ आयुर्वेद क्षेत्रातील वैद्यांसाठी महत्त्वाचा ठरलेला आहे. त्यामुळेच धन्वंतरीच्या नावाभोवताली आयुर्वेदाच्या उत्तुंग ज्ञानाचे तेजोवलय निर्माण झालेले आहे. देवदेवतांचा वैद्य म्हणून कार्य करताना धन्वंतरीने त्यांच्या जगण्यात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणले आणि त्यामुळे जरामृत्यूरहित अशा सुंदर जीवनाची प्राप्ती त्यांना झाली, अमरत्वाचे धनी बनले.
भारतात धन्वंतरीची बहुतांश मंदिरे दक्षिण भारतात वसलेली असून आयुर्वेद चिकित्सा आणि उपचार पद्धतीसाठी ख्यात असलेल्या केरळ राज्यात त्यांचे प्राबल्य पहायला मिळते. केरळात त्रिस्सूरातील वडाक्कांचेरी, कोट्टायम अल्लेपी, चेरथला, प्रधानाम्घिट्टा, कोलम, कांची आदी ठिकाणी धन्वंतरीची मंदिरे आहेत. तामिळनाडूतील वेल्लोरजवळील वलाजापेट आणि कोईंबतूरजवळील रामनाधपूरम येथील धन्वंतरी मंदिरे विशेष प्रसिद्ध आहेत. तामिळनाडूतील रंगनाथ स्वामींच्या मंदिर संकुलात धन्वंतरीची बाराव्या शतकाशी नाते सांगणारी सुंदर पाषाणी मूर्ती असून, तेथे दर दिवशी तिची पूजा केली जाते. महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्हय़ातील दापोलीत धन्वंतरी मंदिर असून तेथील आयुर्वेद उपचार पद्धतीशी संबंधित डोंगरे कुटुंबीयांशी हे मंदिर संबंधित आहे. भारतीय मूर्तीविज्ञान परंपरेने शंख आणि चक्र ही श्रीविष्णूची आयुधे धन्वंतरीच्या हातात देऊन त्याला वैष्णव परंपरेशी जोडलेले आहे. देवदेवतांना अमरत्व प्रदान करणारे अमृत समुद्र मंथनातून प्राप्त झाल्याने हे अमृत कुंभात धारण करून धन्वंतरी निरोगी आयुष्य आणि आरोग्य आपल्या भाविकांना प्रदान करतो अशी लोकश्रद्धा प्रचलित झाल्याकारणाने मूर्तीविज्ञानात त्याला चतुर्भुज दाखवलेला आहे. भारतीय आयुर्वेदाच्या ज्ञानाची परंपरा सनातन काळापासून काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंतच नव्हे तर शेजारच्या राष्ट्रातही पोहोचली होती. एवढेच नव्हे तर हा ज्ञानाचा वारसा अरबांनी भारतातून युरोपातही नेला होता.
मानवी समाजाला आयुर्वेदाने लाभदायक आणि हानीकारक घटकांचे ज्ञान दिले. रोगोपचारच नव्हे तर स्वास्थ्याची अभिवृद्धी कशी करता येईल याचे ज्ञान आयुर्वेदाने दिलेच आहे. सृष्टीनिर्मात्या ब्रह्मदेवाने माणसाच्या परिपालनासाठी आयुर्वेदाची निर्मिती केल्याचे मानले जाते. ब्रह्मदेवाने ही विद्या दक्ष, प्रजापती व भास्कर यांना दिली. दक्षांच्या आयुर्वेदविषयक परंपरेत सिद्धांताला तर भास्कराच्या परंपरेत चिकित्सा पद्धतीला प्राधान्य दिले होते. दक्षाकडून आयुर्वेदाचे ज्ञान अश्विनीकुमारांनी प्राप्त केले. अश्विनीकुमारांनी वृद्ध च्यवन ऋषीला आपल्या चिकित्सेद्वारे तारुण्याची प्राप्ती करून दिली. अश्विनीकुमारांनी आयुर्वेदाचे ज्ञान इंद्राला दिले तर लोककल्याणार्थ इंद्राने त्याचा उपदेश ऋषी भारद्वाजाला केला. भारद्वाजाकडून हे ज्ञान काशीतील द्वितीया धन्वंतरीला लाभले आणि त्याने त्याचा प्रसार आपल्या शिष्यात केला. भारद्वाजाचा दुसरा शिष्य पुनर्वसु आत्रेय त्याने हिमालयात भ्रमंती करून औषधी वनस्पतींचे ज्ञान मिळविले. आत्रेय हे एक हिंडते फिरते आयुर्वेद विद्यालयच होते. औषधी उपचारात पूर्वी वनस्पती व प्राणी यांचा उपयोग करीत. पुढे नागार्जुनापासून पारा, गंधक, खनिज धातू आदींचा उपयोग केला जाऊ लागला.
आहार विहाराला आयुर्वेदाने विशेष महत्त्व दिलेले असून आहार विहार व्यवस्थित सांभाळला तर औषधाची गरजही भासणार नाही, असे चरकसंहितेत म्हटलेले आहे. आपल्या देशातील आयुर्वेदाच्या ज्ञानपरंपरेला समृद्ध करण्यासाठी विविध कालखंडात जन्माला आलेल्या ऋषींनी जसे योगदान दिले त्याचप्रमाणे धन्वंतरी नावाने परिचित ज्ञानवंतांनी त्यात उल्लेखनीय भर वेळोवेळी घातलेली आहे आणि त्यामुळे देवाचा राजवैद्य अशी संज्ञा लाभलेल्या धन्वंतरीचे स्मरण आणि चिंतन शरद ऋतूतील धनत्रयोदशीला केलेले आहे. या परंपरेची आठवण ठेवून भारत सरकारने 2016 पासून धन्वंतरी जयंती राष्ट्रीय आयुर्वेद दिन म्हणून साजरा करण्यास प्रारंभ केलेला आहे ही योग्य बाब आहे. आयुर्वेदाच्या ज्ञानाचा उपयोग शास्त्राrयरित्या प्रभावी कसा होईल यासाठी त्याला संशोधनाची सांगड घालणे महत्त्वाचे आहे.








