ऑनलाइन टीम / जेरूसलम :
संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरस थैमान घालत आहे. कोरोनावरील उपचारात हायड्रॉक्लोरोक्वीन औषध महत्त्वाची भूमिका बजावत आहे. अनेक देशांनी भारताकडे या औषधावरील निर्यात बंदी उठवावी यासाठी मागणी केली होती. त्यानंतर भारताने या औषधावरील बंदी उठवत याची निर्यात सुरू केली.
या निर्णयानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरून कौतुक केले. त्यानंतर आता इस्रायलचे पंतप्रधान बेन्यामिन नेत्यानाहू यांनी देखील ट्विट द्वारे मोदींची स्तुती केली आहे.
ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, हायड्रॉक्लोरोक्वीन पाठवल्याबद्दल माझे प्रिय मित्र नरेंद्र मोदी यांचे धन्यवाद. आम्हाला मदत केल्याबद्दल मी मोदी यांचे मी आभार मानतो.
दरम्यान, याआधी डोनाल्ड ट्रम्प आणि ब्राझीलचे अध्यक्ष बोल्सोनारो यांनी देखील मोदी यांचे आभार मानले आहेत. बोल्सोनारो यांनी तर मोदींची तुलना थेट लक्ष्मणासाठी संजीवनी आणणाऱ्या हनुमानाशी केली होती.









