प्रतिनिधी / कोल्हापूर
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधत आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या करवीर नगरीतून धनगर आरक्षण लढ्याचा एल्गार पुकारण्यात आला आहे. लढ्याचे नव्याने रणशिंग फुंकण्यासाठी कावळा नाका येथील अक्षता मंगल कार्यालय येथे समाजाची पहिली ऐतिहासिक गोलमेज परिषद आयोजित केली आहे. शुक्रवार 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता दसरा चौक येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन परिषदेस प्रारंभ होईल. समाजाचे सर्व लोकप्रतिनिधी, विविध संघटनांचे प्रतिनिधी हजर राहणार असून सर्वानुमते लढ्याची पुढील दिशा ठरविण्यात येईल, अशी माहिती धनगर आरक्षण समन्वय समितीचे निमंत्रक संदीप कारंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कारंडे म्हणाले, परिषदेमध्ये धनगर आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करुन केंद्र व राज्य सरकार विरोधात आरक्षण लढ्याचे नव्याने रणशिंग फुंकले जाणार आहे. परिषदेमध्ये समाजातील आजी-माजी मंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, विविध संघटनांचे प्रतिनिधी आरक्षण लढ्याबाबत सूचना करतील. त्यानुसार आंदोलनाची पुढील दिशा ठरवून लढाई आणखी तीव्र करण्यात येईल.
राज्यात 18 टक्के धनगर समाज आहे. तत्कालीन महायुतीच्या सरकारने धनगर समाजासाठी 22 योजना जाहीर केल्या. यामध्ये आदिवासी विभागाच्या 13 आणि उर्वरित नऊ इतर विभागाच्या योजनांचा समावेश होता. शिष्यवृत्तीसह शैक्षणिक योजना, भूमिहिनांना जमिनी तसेच घरकुल योजनांचा लाभ मिळाणार होता. सरकार या निर्णयामुळे समाजाला दिलासा मिळाला होता. मात्र या सर्व योजना केवळ कागदावरतीच राहिल्या आहेत. त्यामुळे आरक्षणासह अन्य प्रश्नावर परिषदेमध्ये चर्चा होणार आहे. तसेच महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या वाफगांव येथील किल्ल्याचे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकात रुपांतर व्हावे, मेंढपाळ, समाजातील विद्यार्थ्यांसमोर असलेले प्रश्न यावरही परिषदेमध्ये चर्चा होणार आहे.
परिषदेकडे महाराष्ट्रसह देशभरातील समाज बांधवांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे परिषदेमध्ये ठरविल्या जाणाऱया आंदोलनाच्या पुढील दिशेनंतर धनगर जमातीची एसटी आरक्षणाची चळवळ आणखी गतीमान होईल, असा विश्वास निमंत्रक संदीत कारंडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. तसेच समाजाच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या अशा या गोलमेज परिषदेत समाज बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
पत्रकार परिषदेला अशोकराव कोळेकर, कल्लाप्पा गावडे, दशरथ काळे, राजसिंह शेटके, कृष्णा चोपडे, तानाजी हाराळे, बयाजी शेळके, शहाजी सिद, राजू कोळेकर आदींसह समाजाच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
केंद्र सरकारने धनगर समाजाला न्याय द्यावा
धनगर जमातीचा एकही खासदार लोकसभेत नाही. त्यामुळे धनगर समाजाचा आवाज लोकसभेत उठविण्यास अडचणी निर्माण होत आहेत. घटनेत करावी लागणारी दुरुस्ती, कायद्यातील त्रुटी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने पुढकार घ्यावा. धनगर आरक्षण प्रश्नावर लोकसभेत चर्चा घडवून सर्व राजकीय पक्षांचे एकमत घडवून आणून, केंद्र सरकारने धनगर समाजाला न्याय द्याव, अशी मागणी समाजामधून होत आहे.
Previous Articleबेळगाव जिह्यात मंगळवारी 205 कोरोना बाधित रुग्णांची नोंद
Next Article सांगली जिल्ह्यातील 998 कोरोनामुक्त, नवे 506 रूग्ण









