ऑनलाईन टीम / बीड :
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना देखील कोरोनाची लागण झाली असल्याची बातमी समोर आली आहे. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या मंत्र्यांना देखील खबरदारी म्हणून होम क्वारंटाइन होण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून धनंजय मुंडे परळी येथे होते. त्यानंतर त्यांनी 10 जून रोजी मुंबईमध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हजेरी लावली. त्यावेळी मंत्रिमंडळात अनेक मंत्र्याच्या संपर्कात आलेे होते. मंत्री मुंडे यांना कोरोनाची लागण नेमकी कुठे झाली अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळेे त्यांच्या संपर्कात आलेल्या ठाकरे सरकार मधील काही मंत्र्यांनी स्वतःला होम क्वारंटाइन केले आहे.
धनंजय मुंडे पॉझिटिव आढळल्यानंतर त्यांचा मुंबईतील ड्रायव्हर, स्वयंपाकी अशा पाच जणांना देखील कोरोची बाधा झाली असल्याचे समजत आहे.
दरम्यान, ठाकरे सरकार मधील कोरोनाची बाधा झालेले धनंजय मुंडे हे तिसरे मंत्री ठरले आहेत. याआधी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनाही कोरोनाची लागण झाली होती. या दोन्ही मंत्र्यांनी कोरोनावर मात केली आहे.