प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत ताकदीने उतरण्याचे नियोजन केलेल्या भाजपने प्रचार आणि व्यूहरचनेची जबाबदारी माजी खासदार धनंजय महाडिक यांच्याबरोबरच देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्यावर सोपविली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार दोन सदस्यांच्या समितीची घोषणा गुरूवारी करण्यात आली. महाडिक आणि जाधव यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या निवडणूक संचलन समितीची घोषणा येत्या दोन दिवसांत करण्यात येणार आहे.
आगामी दोन तीन महिन्यात कोल्हापूर महापालिकेची निवडणूक होणार आहे. प्रभाग आरक्षण सोडतीने निवडणुकीच्या प्रक्रियेला अनौपचारिकरित्या प्रारंभ झाला आहे. महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी निवडणुकीची तयारी केली आहे. त्यांच्या बरोबरीने भाजपनेही निवडणूक रिंगणात उतरण्याचे नियोजन केले आहे. भाजपचे प्रदेशाध्य चंद्रकांत पाटील यांच्यासाठी होम ग्राऊंडवरील कोल्हापूर महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची आहे. राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीतील काँग्रेस सध्या पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली महापालिका निवडणुकीत उतरणार आहे. 2015 मध्ये महापालिकेत काँग्रेसची सत्ता आणणाऱया पालकमंत्री पाटील आणि काँग्रेसचा सामना भाजपला करावा लागणार आहे. त्यासाठी तुल्यबळ असा नेता म्हणून चंद्रकांत पाटील यांनी माजी खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे प्रचाराची सूत्रे महेश जाधव यांच्यासाथीने दिली आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शहरात बंटी पाटील विरूद्ध मुन्ना महाडिक यांच्यातील राजकीय लढाई होणार आहे.
निवडणूक समितीची दोन दिवसांत घोषणा
महाडिक आणि जाधव यांच्या दोन सदस्यीय समितीकडे प्रचाराची सूत्रे दिल्यानंतर भाजप आता निवडणुकीसाठी असणाऱया संचलन समितीतील इतर सदस्यांची नियुक्तीही करणार आहे. यामध्ये महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, महापालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते विजय सूर्यवंशी, माजी गटतेने अजित ठाणेकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी असणारे अशोक देसाई, विजय जाधव यांचा समावेश होण्याची शक्यता आहे.
जुन्या नव्यांचा समतोल
महापालिकेच्या निवडणुकीची सूत्रे धनंजय महाडिक यांच्याकडे देताना भाजपने जुने आणि नवे यांच्यातील समतोल साधला आहे. महेश जाधव पक्षाचे जुने पदाधिकारी आहेत. तर महाडिक पक्षात जाधव यांच्या तुलनेत नवीन आहेत. पण महाडिक यांची असणारी राजकीय ताकद भाजप नेतृत्वाला माहित असल्याने महाडिक यांच्याकडे नेतृत्व देताना जाधव यांनाही स्थान दिले आहे.
भाजप-ताराराणी कसे लढणार ?
माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे पुत्र स्वरूप महाडिक ताराराणी आघाडीचे प्रमुख आहेत. महापालिका निवडणुकीत भाजप-ताराराणी एकत्रित भाजपच्या कमळ चिन्हावर लढणार की आघाडी करून स्वतंत्र लढणार याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
`तरुण भारत’चे वृत्त आणि निवड
महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षात सुरू असलेल्या घडामोडींवर प्रकाशझोत टाकताना तरुण भारतने 26 डिसेंबरच्या अंकात भाजप-ताराराणीचे स्टेअरिंग धनंजय महाडिकांच्या हातात! अशा आशयाची बातमी दिली होती. गुरूवारी महाडिक यांच्या निवडीने त्यावर शिक्कामोर्तब झाला.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी दिलेली जबाबदारी आणि टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी पक्षातील सर्वांना बरोबर घेऊन महापालिका निवडणुकीत काम करणार आहे. भाजपची सत्ता आणणे हेच माझे मुख्य लक्ष्य असेल.
-धनंजय महाडिक, माजी खासदार