ऑनलाईन टीम / कांगो :
कांगोमध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या 21 कर्मचाऱ्यांनी महिला आणि अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 2018 ते 2020 या काळात इबोला साथीचा सामना करण्यासाठी डब्ल्यूएचओचे कर्मचारी आफ्रिकन देशांमध्ये गेले होते. त्याच काळात डब्ल्यूएचओच्या कर्मचाऱ्यांनी कांगोमधील महिला आणि अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याची बाब एका अहवालातून समोर आली आहे.
न्यूयॉर्क टाईम्सच्या अहवालानुसार, इबोला साथीच्या काळात रुग्णालयात दाखल महिलांवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. अत्याचार करणारे 83 लोक होते. त्यापैकी 21 डब्ल्यूएचओचे कर्मचारी होते. पीडितांकडे मदतीसाठी गेलेले हे कर्मचारी महिलांना त्यांच्या पेयांमध्ये काही द्रव्यं टाकायचे आणि वासनेचा बळी करायचे. अत्याचार कर्त्यांनी काही महिलांवर गर्भपातासाठी दबाव आणल्याचेही या अहवालातून समोर आले आहे.
दरम्यान डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस एडनम घेब्रेसस यांनी या प्रकाराची पुष्टी झाल्यानंतर दु:ख व्यक्त केले आहे. तसेच गुन्हा केलेल्या कर्मचाऱयांना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे, असेही ते म्हणाले.









