ऑनलाईन टीम / छपरा :
बिहार मधील छपरा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जनधन खात्यातून पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका वृध्द महिलेला तुम्ही तर मयत आहात, तुमच्या खात्यातून पैसे कसे देऊ? असे धक्कादायक उत्तर बँकेकडून देण्यात आले आहे. त्यामुळे या महिलेवर अजून एक संकट येऊन ठेपले आहे. कारण या वृध्द महिलेला आता आपण जिवंत आहोत हे सिद्ध करावे लागणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गेल्या आठवड्यातील असून गरीब महिला बनियापुर येथील धवरी टोला गावातील आहे. चानो देवी असे या महिलेचे नाव आहे. चानो देवी ला पैशाची गरज असल्याने चानो देवी पैसे काढण्यासाठी बँकेमध्ये गेली. त्यावेळी तिला बँकेकडून सांगण्यात आले की, तुमचे खाते तर बंद करण्यात आले आहे. यावर तिने कारण विचारले असता बँकेकडून मिळालेल्या उत्तराने तर चानो देवी ला धक्काच बसला. कारण तुमचा तर मृत्यू झाला आहे, त्यामुळे तुमचे खाते बंद करण्यात आले आहे असे बँकेकडून सांगितले गेले.
चानो देवी चा मृत्यू झाला असल्याचे प्रमाणपत्र तिच्या गावाची सरपंच पूनम देवी हिनेच दिले आहे. त्यामुळेचानो देवी अजूनच घाबरून गेली आहे. कारण तिला आता आपण जिवंत असल्याचे सिद्ध करावे लागणार आहे.
दरम्यान, या प्रकरणी अजून कोणतीही कारवाई केली गेली नाही आहे. आता मला मदत कोण करणार असा प्रश्न चानो देवी ने केला आहे. तर बँकेच्या अधिकाऱ्यांनी यावर कारवाई सुरू झाली आहे असे म्हटले आहे.









