ऑनलाईन टीम / पुणे :
वर्गात घुसून दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर चाकूनं सपासप वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यातील वडगाव शेरी परिसरात घडली. या हल्ल्यात विद्यार्थीनी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर सिटी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. एकतर्फी प्रेमातून आरोपीने हा हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव शेरी येथील एका शाळेत दहावीच्या मुलांचा निरोप समारंभ होता, या निमित्ताने ती विद्यार्थीनी आज शाळेत आली होती. त्यावेळी मुलीवर एकतर्फी प्रेम करणारा मुलगा थेट वर्गात शिरला आणि त्याने मुलीवर चाकूनं सपासप वार करत जीवघेणा हल्ला केला. रक्ताच्या थारोळय़ात पडलेल्या विद्यार्थिनीला शिक्षक आणि पालकांच्या मदतीने तातडीने वडगाव शेरी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. दरम्यान, आरोपी तरुण दहावीच्या मुलीवर वार केल्यानंतर तेथून पसार झाला आहे. या घटनेने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. याप्रकरणी शास्त्रीनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.








