सफाई कर्मचारी ताब्यात
ऑनलाईन टीम / यवतमाळ :
लग्न समारंभाला आलेल्या चिमुकलीचा हॉटेलमधील सफाई कर्मचाऱयाने विनयभंग केल्याची घटना समोर येत आहे. यवतमाळमध्ये लग्नाच्या हॉलवर घडलेला हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
यवतमाळमधील दारव्हा रोडवर असलेल्या एका हॉटेलमध्ये लग्न समारंभ होता. या लग्नाला दहा वर्षांची चिमुरडी आपल्या आई-वडिलांसोबत आली होती. चिमुरडी हॉलमध्ये फिरत असतानाच आरोपी सफाई कामगार अक्षय चांदेकर तिच्याजवळ पोहचला व त्याने तिला पकडून तिचा विनयभंग केला. मुलगीनं त्याच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेऊन तिथून लगेचच पळ काढला.
चिमुरडीने घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितल्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आलं. पोलिसांनी आरोपी अक्षय चांदेकरला ताब्यात घेतलं आहे. अक्षय गेल्या काही दिवसांपासून या हॉटेलमध्ये साफ सफाईचे काम करतो. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेतलं आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.








