ऑनलाईन टीम / बलरामपूर :
उत्तरप्रदेशमधील हाथरस येथील अत्याचाराची घटना ताजी असताना पुन्हा एक उत्तर प्रदेशात अशीच एक निर्दयी घटना समोर आली आहे. हाथरस प्रकरणाचा देशभरात निषेध होत असताना आता यूपीतील बलरामपूरमध्ये 22 वर्षीय विद्यार्थिनीसोबत सामूहिक बलात्कार आणि हत्येची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन मुलांनी आपल्या ओळखीच्या मुलीला भेटायला बोलावले आणि तिच्यावर बलात्कार केला. आणि त्यानंतर या आरोपींनी मुलीला कंबर आणि पाय तोडलेल्या गंभीर अवस्थेत रिक्षेतून घरी पाठवले. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
मंगळवारी बलरामपूरच्या कोतवाली गैसडी क्षेत्रात ही घटना घडली. पीडितेच्या आईने आरोप केला आहे की, नराधमांनी तिच्या मुलीची कंबर आणि पाय तोडले होते, ज्यामुळं ती उभे राहू शकत नव्हती.
पीडितेच्या आईने सांगितले की, त्यांची मुलगी मंगळवारी दहा वाजताच्या सुमारास कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी गेली होती. तेव्हा काही नराधमांनी तिचे अपहरण केले आणि तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. सायंकाळपर्यंत ती घरी न आल्याने तिला फोन केला असता तिचा फोन बंद आला. पीडितेला एका रिक्षावाला सात वाजेच्या सुमारास गंभीर अवस्थेत घेऊन आला. तिची अवस्था प्रचंड गंभीर होती. ती काही बोलूही शकत नव्हती. नातेवाईकांनी तिला स्थानिक डॉक्टरांकडे नेले. मात्र स्थिती गंभीर असल्यानं डॉक्टरांनी लखनऊला घेऊन जाण्यास सांगितले, मात्र तुलसीपूर हॉस्पिटलला पोहोचण्याच्या आधीच पीडितेचा मृत्यू झाला.
दरम्यान, पोस्टमाॅर्टम केल्यानंतर पोलिसांच्या बंदोबस्तात पिडीतेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेख यादव यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, हाथरसनंतर आता बलरामपूरमध्येही एका मुलीसोबत सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे आणि गंभीर अवस्थेत तिचा मृत्यू झाला आहे. भाजपा सरकारने बलरामपूरमध्ये हाथरसप्रमाणे निष्काळजीपणे वागू नये आणि गुन्हेगारांवर त्वरित कारवाई करावी.









