ऑनलाईन टीम / ठाणे
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने जगभरात एकच खळबळ उडवून दिली आहे. जगभरात काही ठीकाणी कोरोना लस घेतलेल्यांमध्ये तयार झालेल्या प्रतिकारशक्तीवर सुद्धा हा ओमिक्रोन व्हेरिएंट मात करत असल्याचं समोर आल्यानं जगभरात पुन्हा चिंतेचे वातावरण पसरले आहे. कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने भारताला ही गंभीर इशारा दिला आहे.
कोरोनाच्या या वाढत्या प्रादुर्भावाने जगभरात चींतेचे वातावरण आहे. तसेच केंद्र व राज्य सरकारने ही याबाबतीत आपली दिशा ठरवण्यासाठी तातडीने बैठका ही बोलवल्या आहेत. असे असले तरी कोरोना संदर्भाने महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील खडवली वृद्धाश्रमातील तब्बल ६७ वृद्धांना कोरोनाची लागण झाली असल्याची खऴबऴजनक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्या सर्वांना तातडीने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये एका लहान मुलासह ३९ पुरुष तर एका लहान मुलीसह २८ महिलांचा समावेश आहे. एकीकडे जिल्हा रुग्णालयात अवघ्या चार ते पाच रुग्णांवर उपचार सुरु असतांना येथील कर्मचारी वर्ग काहीसे निवांत होण्याच्या मार्गावर होते. दरम्यान, खडीवलीतून हे रुग्ण आणण्यात येणार असल्याची माहिती कळताच रुग्णालय प्रशासनाची चांगली धावपळ उडाली.