ऑनलाईन टीम / पुणे :
पुण्यातील कोंढवा परिसरात एका सराईत गुन्हेगाराचा राहत्या घरात घुसून कोयत्याने वार करून खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घनश्याम उर्फ पप्पू पडवळ असे खून झालेल्याचे नाव आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पप्पू पडवळ हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. याआधी तो कार चालक म्हणून काम करत होता. त्याच्यावर एका टोळीकडून वार करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी त्याचे वाद देखील झाले होते. सध्या तो व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय करीत होता. कोंढव्यातील ब्रम्हा काॅंट्री बोर्डिंग मधील पाचव्या मजल्यावर तो राहत होता. मागील दोन दिवसापासून तो एकटाच होता.
दरम्यान अज्ञातांनी घरात घुसून त्याच्यावर सपासप वार करून त्याचा खून केला. ही माहिती पोलिसांना समजल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे.








