ऑनलाईन टीम / जोधपूर :
राजस्थानातील जोधपूर मध्यवर्ती कारागृहातील एका कैद्याने आपल्या मलाशयात तब्बल चार मोबाईल लपविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
देव राम (वय 32) असे मोबाईल लपवलेल्या कैद्याचे नाव आहे. या कैद्याच्या पोटात दुखू लागल्याने त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोटात असह्य वेदना होत असल्याने एक्सरे आणि सोनोग्राफी करण्यात आली. ते रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले. कैद्याच्या मलाशयात प्लास्टिक बॅगेमध्ये गुंडाळलेले चार छोटे मोबाईल दिसले.
कैद्याने हे मोबाईल मलाशयात लपवल्याची कबुली दिली आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया करून हे मोबाईल बाहेर काढण्यात आले आहेत. त्याची प्रकृती स्थिर आहे. या कैद्याकडे हे मोबाईल नेमके कुठून आले, याचा तपास जोधपूर पोलीस करत आहेत.