ऑनलाईन टीम / कोटा :
राजस्थानमधील कोटा शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोटा येथील एका सरकारी रुग्णालयात एका 40 वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबातील व्यक्तीच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली आहे. या व्यक्तीने वॉर्ड मधील कुलर सुरू करण्यासाठी व्हेंटिलेटरचा प्लग काढला. त्यामुळे रुग्णालयात दाखल असलेले महाराव भीम सिंह यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मृत झालेल्या रुग्णाला 13 जून रोजी कोरोनाचा संशय असल्याने आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, कोरोनाची चाचणी झाल्यावर त्यांना कोरोनाची लागण नसल्याचे निष्पन्न झाले. यानंतर आयसीयूमधील एका व्यक्तीला करोनाची लागण झाल्याचे कळताच, डॉक्टरांनी रुग्णाला दुसऱ्या वॉर्डात हलवलं. या वॉर्डात उकाडा होत असल्यामुळे रुग्णाच्या कुटुंबाने कुलरची सोय केली…मात्र कुलरसाठी सॉकेट न सापडल्यामुळे कुटुंबातील व्यक्तीने चक्क व्हेंटीलेटरचा प्लग काढला. अर्ध्या तासानंतर व्हेंटीलेटरची पॉवर संपल्यानंतर रुग्णाला त्रास व्हायला लागला.
त्यानंतर डॉक्टरांना याबाबत माहिती दिली असता डॉक्टरांनी रुग्णाला वाचवण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत रुग्णाचा मृत्यू झाला, असे रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. नवीन सक्सेना यांनी सांगितले आहे.
दरम्यान, या प्रकाराची चौकशी करण्यासाठी मुख्य अधीक्षक, नर्सिंग अधिक्षक आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी यांच्या समितीची स्थापना करण्यात आलेली असून लवकरात लवकर हा अहवाल दिला जाणार आहे. तसेच अहवालात दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जाईल अशी माहिती यावेळी प्रशासनाने दिली आहे.









