बारामती : द नेस्ट फाउंडेशनकडून बारामतीतील कोविड केअर सेंटरमधील रुग्णांसाठी उकडलेली अंडी पुरवली जात आहेत. रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती वाढावी, या सामाजिक हेतूने हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष फैय्याज शेख व सहकाऱ्यांनी सांगितले.
बारामतीत दौंड, इंदापूर, फलटण, पुरंदर, माळशिरस, करमाळा, कर्जत, पुणे,पिंपरी-चिंचवड या भागातील रुग्ण येथे उपचार घेत आहेत. येथे सौम्य लक्षणे असलेल्या अथवा लक्षणे नसलेल्या कोविड रुग्णांसाठी सामाजिक संस्थांच्या सहकार्याने सहा कोविड सेंटर कार्यान्वित करण्यात आली आहेत. येथील बेड फुल्ल झाले आहेत. या संकटकाळात सामाजिक संस्था मदतीसाठी पुढे येत आहेत.
प्रोटीनयुक्त उकडलेली अंडी रुग्णांना देण्याचे द नेस्ट फाउंडेशनने निश्चित केले होते. त्यानुसार प्रशासकीय स्तरावर व व्यवस्थापनाशी बोलून त्यांनी ही परवानगी मिळवली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह, तारांग महिला वसतिगृह व डॉ. बाबासाहेब आंबेडकरवसतिगृह येथील कोविड केंद्रांना अंड्यांचा पुरवठा करण्यात आला.








