आयसीसी महिला वनडे विश्वचषक : यजमान न्यूझीलंडविरुद्ध रोमांचक लढतीत 2 गडी राखून मात, मेरिझेन सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू

वृत्तसंस्था /हॅमिल्टन
दक्षिण आफ्रिकेने आयसीसी महिला क्रिकेट वनडे विश्वचषक स्पर्धेतील रोमांचक साखळी सामन्यात यजमान न्यूझीलंडवर 2 गडी राखून निसटता विजय संपादन केला आणि आपली अपराजित घोडदौड कायम राखली. न्यूझीलंडने 47.5 षटकात सर्वबाद 228 धावा जमवल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने 49.3 षटकात 8 बाद 229 धावांसह विजयावर शिक्कामोर्तब केले. 44 धावात 2 बळी व 35 चेंडूत नाबाद 34 असे अष्टपैलू योगदान देणारी मेरिझेन कॅप सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरली.
सीमर्स अयाबोंगा खाका (3-31), शबनीम इस्माईल (3-27) व मेरिझेन (2-44) यांच्या भेदक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडला सर्वबाद 228 धावांवर समाधान मानावे लागले. सेडॉन पार्कवरील या लढतीत किवीज संघातर्फे सोफी डीव्हाईनने सर्वाधिक 93 धावांचे योगदान दिले.
त्यानंतर लॉरा वुलव्हार्ट (67) व कर्णधार लूस (51) यांनी शानदार अर्धशतके झळकावली. अयाबोंगा (नाबाद 2) व मेरिझेनने (नाबाद 34) विजयाची औपचारिकता पूर्ण केली. दक्षिण आफ्रिकेचा हा या स्पर्धेतील चौथा विजय असून या निकालासह गुणतालिकेतील आपले दुसरे स्थान त्यांनी आणखी भक्कम केले. न्यूझीलंडचा संघ 5 सामन्यात केवळ 2 विजय संपादन करु शकला असून उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी त्यांना उर्वरित दोन्ही सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावे लागणार आहेत.
गुरुवारी विजयासाठी 229 धावांचे आव्हान असताना सलामीवीर लिझेले ली (17) व वुलव्हार्ट यांनी उत्तम सुरुवात केली. पण, धाव घेण्यात गोंधळ उडाल्यानंतर लिझेलेला धावचीत होत तंबूत परतावे लागले. वुलव्हार्टने मात्र एक बाजू लावून धरत जम बसल्यानंतर खराब चेंडूंचा समाचार घेण्यास सुरुवात केली. दोन-एक जीवदाने लाभल्याने ती आणखी सुदैवी ठरली.
ऍमेलिया केरने (3-50) वुलव्हार्टला डावातील 36 व्या षटकात पायचीत करत तिची लूससमवेत 88 धावांची भागीदारी संपुष्टात आणली. नंतर पुढील षटकातच मिग्नॉन डय़ू प्रीझला (1) बाद करत आणखी एक धक्का दिला. 41 व्या षटकात लूसला कॅटे मार्टिनने झेलबाद केले, त्यावेळी दक्षिण आफ्रिकन संघ विजयाच्या ट्रकवरुन बाजूला होत असल्याचे चित्र होते. पण, मेरिझेनने एक बाजू लावून धरत आवश्यकतेनुसार, चौकारही फटकावले.
सोफी डीव्हाईनची फटकेबाजी

तत्पूर्वी, सोफी डीव्हाईनने 101 चेंडूत 12 चौकार व 1 षटकारासह 93 धावांची खेळी साकारत 42 धावा जमवणाऱया ऍमेलिया केरसमवेत 81 धावांची भागीदारी साकारली. याशिवाय तिने मॅडी ग्रीनसमवेत आणखी 80 धावा जोडल्या. ग्रीनने 30 धावांचे योगदान दिले. मात्र, 41 व्या षटकात डीव्हाईनचा अयाबोंगाने त्रिफळा उडवल्यानंतर न्यूझीलंडच्या डावात नाटय़मय पडझड सुरु झाली. एकवेळ तर अवघ्या 30 धावात त्यांनी 6 फलंदाज गमावले आणि 48 व्या षटकातच त्यांचा डाव खुर्दा झाला. डीव्हाईन व केर यांनी दुसऱया गडय़ासाठी 81 धावांची भरभक्कम भागीदारी साकारली. लूसने (1-48) केरला बाद करत ही जोडी फोडली. लूसने नंतर अनुभवी सॅटरवेटला देखील तंबूचा रस्ता दाखवला होता.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड : 47.5 षटकात सर्वबाद 228 (सोफी डीव्हाईन 101 चेंडूत 12 चौकारांसह 93, ऍमेलिया केर 58 चेंडूत 5 चौकारांसह 42, मॅडी ग्रीन 58 चेंडूत 1 चौकारांसह 30, ब्रूक हॉलिडे 29 चेंडूत 1 चौकारांसह 24. अवांतर 12. शबनीम इस्माईल 9 षटकात 3-27, अयाबोंगा 3-31, मेरिझेन कॅप 2-44, सुने लूस 1-48).
द. आफ्रिका : 49.3 षटकात 8 बाद 229 (लॉरा वुलव्हार्ट 94 चेंडूत 6 चौकारांसह 67, लूस 73 चेंडूत 4 चौकारांसह 51, कॅप 35 चेंडूत नाबाद 34. ऍमेलिया केर 3-50, मकाय 2-49, रोव्ह, डीव्हाईन प्रत्येकी 1 बळी).
सेमीफायनलसाठी भारताला किमान 2 विजय आवश्यक
यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत भारताने 4 सामन्यात 2 विजय व 2 पराभव अशी संमिश्र कामगिरी नोंदवली असून उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी संघाला उर्वरित 3 पैकी 2 सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावेच लागणार आहेत. भारताच्या पुढील 3 लढती अनुक्रमे ऑस्ट्रेलिया (दि. 19), बांगलादेश (दि. 22), दक्षिण आफ्रिका (दि. 27) या संघाविरुद्ध होत असून यात बांगलादेशचे आव्हान सोपे असू शकते. ऑस्ट्रेलिया व द. आफ्रिकेविरुद्ध मात्र भारताला पूर्ण अनुभव पणाला लावला तरच विजयाची अपेक्षा करता येईल, असे चित्र आहे.










