एन्गिडीचे 4, पार्नेलचे 3 बळी, मार्करम, मिलरची अर्धशतके
वृत्तसंस्था/ पर्थ
सामनावीर लुंगी एन्गिडी व वेन पार्नेल यांचा भेदक मारा आणि एडन मार्करम व डेव्हिड मिलर यांची अर्धशतके तसेच भारताचे गचाळ क्षेत्ररक्षण यांच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने येथे झालेल्या टी-20 विश्वचषक सुपर 12 फेरीतील सामन्यात भारताचा 5 गडय़ांनी पराभव करीत गुणतक्त्यात आघाडीचे स्थान मिळविले. 29 धावांत भारताचे आघाडीचे चार फलंदाज बाद करणाऱया एन्गिडीला सामनावीर पुरस्कार मिळाला. एकाकी लढत देणाऱया सूर्यकुमार यादवचे संस्मरणीय अर्धशतक वाया गेले.
या स्पर्धेतील भारताचा हा पहिला पराभव असून पुढील सामना बुधवारी 2 नोव्हेंबर रोजी बांगलादेशविरुद्ध होणार आहे. पाकिस्तानला उपांत्य फेरीसाठी थोडीफार आशा निर्माण झाली आहे. मात्र त्यांना बांगलादेशच्या पुढील सामन्याच्या निकालावर अवलंबून रहावे लागेल.

भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतला. पण निर्धारित 20 षटकांत भारताला 9 बाद 133 धावांची मजल मारता आली. त्यानंतर द.आफ्रिकन डावही 3 बाद 24 असा गडगडला होता. पण मार्करम व मिलर यांनी 76 धावांची भागीदारी करून डाव सावरला. नंतर मिलरने पार्नेलसमवेत विजयाचे सोपस्कार पूर्ण करीत 5 गडय़ांनी विजय मिळवून दिला. भारताच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचा लाभ घेत मार्करमने 41 चेंडूत 6 चौकार, 1 षटकारासह 52 तर मिलरने 46 चेंडूत 3 चौकार, 3 षटकारांसह नाबाद 56 धावा फटकावल्या. भारताने किमान तीन झेल सोडले तर दोनदा धावचीतच्या संधी दवडल्या. अर्शदीप सिंगने 2 तर शमी, हार्दिक पंडय़ा व आर. अश्विन यांनी एकेक बळी मिळविले.
पेस व बाऊन्स असलेल्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांचे तंत्र पुन्हा एकदा उघडे पडले. वातावरणाचा पुरेपूर लाभ घेत एन्गिडीने प्रथम फलंदाजी स्वीकारलेल्या भारताचे पहिल्याच षटकात दोन बळी मिळविले आणि नंतरच्या एकेक षटकात त्याने आणखी दोघांना बाद करीत भारताला बॅकफूटवर नेले.
नवव्या षटकातच भारताची स्थिती 5 बाद 49 अशी नाजूक बनली. सूर्यकुमार यादवने पुन्हा एकदा तडफदार फलंदाजी करीत भारताचा डाव दिनेश कार्तिकसमवेत 52 धावांची भागीदारी करून डाव सावण्याचा प्रयत्न केला. त्यात कार्तिकचा वाटा फक्त 6 धावांचा होता. गोलंदाजीस अनुकूल खेळपट्टीवर त्याच्याकडे उत्तम टेक्निक नसल्याचे पाहून सूर्याने त्याला शील्ड करीत अर्धशतकी भागीदारी केली. सूर्याच्या अर्धशतकी खेळीमुळेच भारताला 132 धावांची मजल मारता आली. सूर्याने भेदक मारा करणाऱया एन्गिडीला पुलचा शानदार षटकार ठोकला तर बॉलर्सबॅक ड्राईव्हचा अप्रतिम चौकार लगावत अर्धशतक पूर्ण केले. पण त्याला इतरांकडून पुरेशी साथच मिळाली नाही. त्याने या संस्मरणीय खेळीत 40 चेंडूत 68 धावा फटकावताना 6 चौकार, 3 षटकार मारले. त्याने वेगवान गोलंदाजांना समोरून हल्ला करण्याऐवजी स्क्वेअरच्या मागील बाजूस फटकावत धावा वसूल केल्या. केशव महाराजच्या स्पिनवर त्याने लेट कट व लॅप स्वीपचा वापर केला. भारताच्या डावात कर्णधार रोहित शर्मा (14 चेंडूत 15) व विराट कोहली (11 चेंडूत 12) या अन्य दोघांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. अक्षर पटेलच्या जागी दीपक हुडाला या सामन्यात भारताने दिली. पण तो शून्यावर बाद झाला. पार्नेलने एन्गिडीला चांगली साथ देत 15 धावांत 3 बळी मिळविले तर नॉर्त्जेने 1 बळी मिळविला.
संक्षिप्त धावफलक ः भारत 20 षटकांत 9 बाद 133 ः केएल राहुल 9, रोहित शर्मा 15 (14 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), कोहली 12 (11 चेंडूत 2 चौकार), सूर्यकुमार यादव 68 (40 चेंडूत 6 चौकार, 3 षटकार), हुडा 0, हार्दिक 2, कार्तिक 6, अश्विन 7, भुवनेश्वर नाबाद 4, शमी 0, अर्शदीप नाबाद 2, अवांतर 8. गोलंदाजी ः एन्गिडी 4-29, पार्नेल 3-15, नॉर्त्जे 1-23.
द.आफ्रिका 19.4 षटकांत 5 बाद 134 ः डी कॉक 1, बवुमा 10, रॉसो 0, मार्करम 52 (41 चेंडूत 6 चौकार, 1 षटकार), मिलर नाबाद 56 (46 चेंडूत 3 चौकार, 3 षटकार), स्टब्स 6, पार्नेल नाबाद 2, अवांतर 7. गोलंदाजी ः अर्शदीप 2-25, शमी 1-13, हार्दिक 1-29, अश्विन 1-43.









