भाजप आमदाराचा मानला जातो बालेकिल्ला
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे चेहरे इशुदान गढवी हे द्वारका मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. पक्षाकडून त्यांच्यासाठी द्वारका आणि खंभालिया मतदारसंघ सोडण्यात आले होते. गढवी हे द्वारकेमधून निवडणूक लढविणार असल्याचे समजते. 7 वेळा निवडून आलेल्या पबुभा माणेक यांना गढवी आव्हान देणार आहेत.
माणेक हे 1990 पासून सातत्याने द्वारकेमधून विजयी होत आहेत. माणेक यांनी पहिल्या तीन निवडणुका अपक्ष म्हणून जिंकल्या होत्या. त्यानंतर त्यांनी 2002 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळविला होता. माणेक यांनी पक्ष बदलत भाजपने प्रवेश केला होता. 2007, 2012 आणि 2017 च्या निवडणुकीतही तेच विजयी झाले. 66 वर्षीय पबुभा हे मागील 32 वर्षांपासून आमदार आहेत. तसेच त्यांनी गुजरातचे आरोग्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. माणेक हे वाघेर समुदायाशी संबंधित नेते आहेत. या समुदायाच्या लोकांमध्ये पबुभा यांची प्रतिमा मोठय़ा भावासारखी आहे.
2017 च्या निवडणुकीत माणेक यांनी काँग्रेस उमेदवार अहिर मेरामन मारखी यांना 5,739 मतांनी पराभूत पेले होते. या मतदारसंघात गढवी उमेदवारी अर्ज भरणार असल्याने लढत त्रिकोणी होणार आहे. गढवी द्वारकेतून निवडणूक लढवत आम आदमी पक्षाच्या बाजूने वातावरण निर्मिती करू पाहत असल्याची चर्चा आहे. परंतु द्वारका मतदारसंघातील त्यांच्यासमोरचे आव्हान मोठे आहे.









