प्रत्येकाच्या आयुष्याचं एक ध्येय असतं. उद्दिष्ट असतं. या उद्दिष्टाची निवड केली की आयुष्य खूप सुंदर वाटू लागतं. ऑलिम्पिकमधले अनेक पदकविजेते खेळाडू आसाम, मणीपूरसारख्या ईशान्येकडच्या राज्यातले आहेत. ही राज्य छोटी आणि मागास असली तरी त्यांच्यात काहीतरी करून दाखवण्याची धमक असते. आसामची अंजली दासही फिटनेसबाबत जागरूकता निर्माण करते आहे. यासाठी ती बरंच अंतर पायी कापताना दिसते.
कोरोनाच्या या काळात आपल्याला तंदुरुस्तीचं महत्त्व पटलेलं आहे. निरोगी जगण्यासाठी शारीरिक तंदुरुस्तीचं महत्त्व वादातीत आहे. तंदुरुस्ती टिकवून ठेवण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करतो. जीमला जातो. सायकल चालवतो. आसाममधल्या एका छोटय़ाशा गावात राहणार्या अंजली दासलाही फिटनेसचं महत्त्व पटलेलं आहे आणि इतरांनाही याचं महत्त्व पटावं या उद्देशाने ती झटते आहे. अंजलरीने आसामधल्या मिर्जापासून लडाखपर्यंतचं अंतर पायी कापण्याचा निर्णय घेतला असून 13 ऑगस्टपासून तिच्या या प्रवासाला सुरूवात झाली आहे. या कामासाठी अंजलीने स्वतःच्या खिशातली रक्कम मोजली असून यासाठी तिला गावकर्यांचीही साथ लाभली आहे. त्यांनीही तिला आर्थिक मदत दिली आणि तिचं मिशन तंदुरुस्ती सुरू झालं. ं
यानंतर तिने 140 किलोमीटर अंतर कापलं. ती चालत पश्चिम बंगालच्या सीमेलगतच्या कोकराजार या जिल्ह्यात पोहोचली. अंजलीने दिवसभरात 50 किलोमीटर अंतर कापण्याचा निर्णय घेतला आहे. अंजलीला मॅरेथॉन खूपच प्रिय आहे. चालल्यामुळे आपल्याला किती लाभ होतात हे तिला लोकांना पटवून द्यायचं आहे. आसामधल्या मिर्जा गावची रहिवासी असणारी अंजली देशभरात आयोजित होणार्या अर्ध मॅरॅथॉन स्पर्धांमध्ये सहभागी होत असते. कोलकाता मॅरॅथॉनमध्ये अंजलीने 21 किलोमीटर अंतर कापलं होतं. 2018 तसंच 2019 च्या कोलकाता हाफ मॅरॅथॉन स्पर्धेत अंजलीला रौप्य पदकही मिळालं आहे. अंजली स्वतःचा फिटनेस तर जपत असतेच शिवाय इतरांनाही चालण्यासाठी प्रोत्साहन देत असते. हेच तिच्या जीवनाचं उद्दिष्ट आहे. फिटनेसप्रती जागरूकता निर्माण करण्याच्या कार्याला तिने वाहून घेतलं आहे.
अंजली मुंबईमध्ये आयोजित मॅरॅथॉन स्पर्धांमध्येही सहभागी होत असते. गेली दोन वर्षं कोरोनामुळे मॅरॅथॉन स्पर्धा पार पडलेल्या नाहीत. मात्र यामुळे अंजली शांत बसली नाही. तिने या वेळेचा सदुपयोग करायचं ठरवलं. अंजलीला आसामच्या पर्यटनालाही प्रोत्साहन द्यायचं आहे. याच कारणामुळे ती लडाखपर्यंतचं अंतर कापते आहे. अंजलीचा दृढनिश्चय खरंच वाखाणण्याजोगा आहे. एखादं उद्दिष्ट ठरवून त्याप्रमाणे वागता येतं. या मार्गात कितीही अडचणी आल्या तरी त्या दूर करता येतात, हेच अंजलीने दाखवून दिलं आहे.









