अनेक संकटामुळे देशाची सध्या चारही बाजूने कोंडी झाली आहे. एकाचवेळी या सर्व धोक्यांशी आपण लढत आहोत. राष्ट्राच्या पुनर्बांधणीची गरज असतानाच युगपुरुष लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिशताब्दीचीही सांगता होत आहे. आधुनिक राष्ट्रनिर्मितीचे त्यांनी अग्निकुंड पेटवले. प्रखर राष्ट्रवाद पेटवला. जनमानसातील स्वत्व जागे केले. स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि परकीय मालावर बहिष्कार या चतु:सूत्रीचा वापर एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात अगदी निष्ठेने अंगिकारते. किंबहुना या चतु:सूत्रीच्या आधारावर एखाद्या व्रतस्थासारखे आयुष्य जगते. परंतु याच चतु:सूत्रीचा वापर करण्याची निकड त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर शंभराव्या वर्षात देशावरील संकटाशी सामना करण्यासाठी भासावी, हा केवळ योगायोग नाही तर त्या युगपुरुषाचे मोठेपण आणि द्रष्टेपण आहे. लो. टिळक हे काळाच्या कितीतरी पुढचे पाहणारे होते म्हणूनच ते जनमानसावर प्रभाव टाकू शकले. स्वातंत्र्यसंग्रामाच्या प्रारंभीच्या काळात दादाभाई नौरोजी, न्या. रानडे, नामदार गोखले आदी मवाळ नेते आपापल्या परीने ब्रिटिश साम्राज्याविरोधात समाजजागृती करत होते. पण त्यांच्या विचारांना गती देण्यासाठी एका आक्रमक व जहाल नेतृत्वाची गरज होती. टिळकांच्या रुपाने ती पुरी झाली. त्यांच्या खंबीर नेतृत्वामुळेच बलाढय़ ब्रिटिश सत्तेला हादरे बसले. साम्राज्याचा पाया खिळखिळा झाला. लोकमान्यांच्या प्रेरणेतून चळवळीला जी दिशा मिळाली त्यामुळे स्वातंत्र्यसंग्रामातील अनेक नेत्यांनी व स्वातंत्र्यसैनिकांनी पुढील काळात ब्रिटिश सत्तेला सळो की पळो करून सोडले. टिळकांची दूरदृष्टी सत्यात उतरवली. एखाद्या ध्येयासाठी व तत्त्वासाठी मरण पत्करणे हे अतुलनीय आहेच; पण ज्वलंत राष्ट्रवाद, स्वराज्य, स्वदेशी, परकीय वस्तूंवर बहिष्कार यासारख्या कठोर ध्येयांवर श्रद्धा ठेवून आयुष्यभर त्याचा पाठपुरावा करणे, अन्यायाविरोधात लोकांच्यात असंतोष निर्माण करणे, अंगिकारलेल्या ध्येयासाठी आयुष्यभर हालअपेष्टा सहन करणे, हालअपेष्टा होऊनही आपल्या ध्येयापासून शेवटच्या श्वासापर्यंत तसूभरही न ढळणे याला फार मोठे धैर्य लागते. हे असामान्य धारिष्टय़ टिळकांच्या व्यक्तिमत्त्वात होते. स्वातंत्र्यानंतरच्या सहा-सात दशकानंतर आपण जागतिकीकरण, उदारीकरणाच्या कालखंडात पोहोचलो आहोत. जगाच्या बाजारपेठेत भारतदेखील एक वैश्विक खेडे बनले. वैश्विकीकरणाचा आपण हिस्सा बनलो खरा; पण राष्ट्रवाद जिवंत ठेवून जागतिक परिस्थितीचा लाभ कसा उठवायचा हे आपल्याला समजले नाही. चीन, रशिया, जर्मनी, जपान यासारख्या राष्ट्रांनी राष्ट्रवाद जिवंत ठेवून आपली संस्कृती जपत आपली प्रगती केली. देशाची अर्थव्यवस्था बळकट केली. भाषा समृद्ध केली. या देशातील नेतृत्वाने आपापल्या देशाला आर्थिक विकासाच्या एका उंचीवर नेऊन ठेवले. अशा कालखंडात भारताला दूरदृष्टी व खंबीर नेतृत्व देणाऱया एखाद्या नेत्याची वानवा जाणवते. याचठिकाणी आधुनिक राष्ट्रनिर्मितीबाबत टिळकांचे कर्तृत्व आणि विचार अधोरेखित होतात. चीन भारताकडे केवळ बाजारपेठेच्या भावनेतूनच पाहतो. भारत आर्थिकदृष्टय़ा सक्षम न होता आपल्यासमोर तो नेहमीच दुबळा व कमकुवत रहावा, हेच चिनी धोरण राहिले आहे. आपल्या बाजारपेठेचा कब्जा घेत गणेशोत्सवाच्या लाईटच्या माळांपासून ते दिवाळीच्या आकाशकंदिलाच्या माध्यमातून चिनी वस्तूंनी आपल्या घरात कधी घुसखोरी केली हे आपल्याला समजलेच नाही. सध्या भारतीय बाजारपेठेवर तब्बल 70… कब्जा चिनी उत्पादनांचा आहे. स्वस्त आणि मस्त, वापरा आणि फेकून द्या, या व्यापारनीतीचा वापर करून चीनने अख्खी बाजारपेठ काबीज केली आहे. चीन-भारतादरम्यान तणाव निर्माण होताच टिळकांचा स्वदेशी भाव देशात ठिकठिकाणी जागा झाला. दुर्दैवाने स्वदेशीचा विचारच जणू आपल्या विस्मृतीत गेला होता. चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन ठिकठिकाणी करण्यात आले. आपण वेगळे काही करतो असा आव यामध्ये होता. वास्तविक, यात नवीन काही नव्हते. सव्वाशे वर्षांपूर्वी टिळकांनी हे अस्त्र भारतीयांना दिले होते. टिळकांच्या नेतृत्वाखाली सरकारविरोधात ब्रिटिश मालावर बंदी घालण्यासाठी स्वदेशी आंदोलन झाले होते. भारत मोठी बाजारपेठ आहे हे टिळकांनाही समजत होते. म्हणूनच आपल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी देशांतर्गत उद्योग-व्यवसाय वाढीवर त्यांनी भर दिला होता. या भावनेतून परदेशी मालावर बहिष्कार व स्वदेशीचा नारा त्यांनी दिला होता. चीनने अख्खी भारतीय बाजारपेठ व उद्योगधंदे गिळंकृत केल्यानंतर आपण आता जागे झालो आहोत. या पार्श्वभूमीवर लोकमान्यांनी त्यावेळी दिलेली स्वदेशीची व परकीय मालावरील बहिष्काराची हाक किती रास्त होती हे आता 100… पटले आहे. टिळक पुस्तकी पंडित नव्हते, पण त्यांना देशाची आर्थिक नाडी बरोबर समजत होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातून चीनची आर्थिक कोंडी झाल्यानंतर उद्योग-व्यवसायांमध्ये आपल्याला कशी सुवर्णसंधी आहे हे एकापेक्षा एक अर्थतज्ञांकडून सांगितले जात आहे. देशाचा आर्थिक कणा बळकट करण्यासाठी परदेशी मालावर बहिष्कार टाकून स्वदेशी वस्तू वापरा हा मूलमंत्र सव्वाशे वर्षांपूर्वी टिळकांनीच दिला आहे. पण यासाठी देशी उद्योगपतींनी उद्योगधंदे सुरू करायला हवेत, असा त्यांचा आग्रह होता. टिळकांचे हे द्रष्टेपण जागतिकीरणात वाढलेल्या कुठल्याही राजकीय नेत्याकडे नाही हेच खरे दुर्दैव. प्लेगच्या साथीत टिळकांनी सरकारला सहकार्याची भूमिका घेतली होती. परंतु चुकीच्या निर्णयाविरोधात सरकारविरोधात दंडही थोपटले. लोकांनी घरात बसून अर्थव्यवस्थेची चाके फिरणार नाहीत. योग्य ती काळजी घेऊन उद्योग-व्यवसाय सुरु झाले पाहिजेत, असे त्यांनी सरकारला खडसावून सांगितले. राजकीय लढा उभा केला, पण आधुनिक राष्ट्रनिर्मितीसाठी आवश्यक अर्थव्यवस्थेतेचा बारकावाही त्यांच्याकडे होता. या युगपुरुषास स्मृतिशताब्दी सांगते निमित्त अभिवादन !
Previous Articleयुगपुरुष लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








