स्टॅलिन यांच्या चप्पलेपेक्षाही पलानिसामी स्वस्त
तामिळनाडूत विधानसभा निवडणुकीपूर्वी द्रमुक आणि अण्णाद्रमुक यांच्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. याचदरम्यान माजी केंद्रीय मंत्री आणि द्रमुकचे खासदार ए. राजा यांच्या विधानामुळे वाद उभा ठाकला आहे. त्यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानिसामी यांची तुलना द्रमुक प्रमुख एम.के. स्टॅलिन यांच्या चप्पलेशी केली आहे. पलानिसामींची किंमत स्टॅलिन यांच्या चप्पलेपेक्षाही कमी असल्याचे राजा यांनी म्हटले आहे.
पलानिसामी गूळ आणि साखरेच्या बाजारात काम करत होते. अशा स्थितीत ते स्टॅलिन यांना कसे आव्हान देऊ शकतात? स्टॅलिन याच्या चप्पलेची किंमत देखील पलानिसामी यांच्यापेक्षा एक रुपयाने अधिक असेल. जे धाडस नेहरू, इंदिरा गांधी किंवा नरेंद्र मोदी दाखवू शकले नाहीत, ते पलानिसामी दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत. लुटलेल्या पैशांमुळे ते वाचतील असे पलानिसामी यांना वाटते. स्टॅलिन यांना रोखणार असल्याचे ते सांगत आहेत. पण त्यांनी एक दिवस देखील असे कृत्य केले तर त्याचे वाहन घरापासून कार्यालयात पोहोचणार नसल्याचे ए. राजा म्हणाले. राजा यांच्या वादग्रस्त विधानांवर सोशल मीडियावर प्रचंड टीका होत आहे.
पलानिसामींचे प्रत्युत्तर
पलानिसामी यांनी राजांच्या वादग्रस्त विधानावर प्रत्युत्तर दिले आहे. राजा यांच्यावर घोटाळय़ाचा आरोप आहे. माझी किंमत स्टॅलिन यांच्या चप्पलेपेक्षाही कमी असल्याचे ते म्हणत आहेत. एका मुख्यमंत्र्यांची तुलना एका चप्पलेशी कशी काय केली जाऊ शकते? मी एक शेतकरी असून आम्ही गरीबच राहू. आम्ही मेहनत करतो आणि आमच्या क्षमतेनुसारच आम्ही गोष्टी खरेदी करतो. राजा यांनी 1.76 लाख कोटींचा भ्रष्टाचार केला असल्याने ते काहीही खरेदी करू शकतात असे पलानिसामी यांनी म्हटले आहे.









