कार्वे/ वार्ताहर
दौलत सहकारी साखर कारखाना संचलित अथर्व इंटर ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड, कोल्हापूर. कारखान्याने आज अखेर गळीतास आलेल्या उसास शंभर रुपये प्रती टन प्रमाणे दुसरा हप्ता जाहीर केला आहे. आजपासूनच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यात येणार असल्याची माहिती अथर्वचे चेअरमन मानसिंगराव खराटे यांनी हलकर्णी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना चेअरमन खोराटे म्हणाले, आज अखेर गाळप झालेल्या उसाला प्रति टन शंभर रुपये व आज पासून गाळप होणाऱ्या उसास एक रकमी २७०० रुपये प्रती टन प्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा करण्यात येणार आहेत. तर, गळीत हंगाम समाप्तीच्या दरम्यान उसाचा साखर उतारा पाहून पुन्हा एक हप्ता देण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आज अखेर १ लाख ६५ हजार टन उसाचे गाळप झाले असून, अजूनही साखर उतारा १२ च्या पुढे गेलेला नाही. बाराच्या पुढे साखर उतारा गेल्यास अजूनही चार पैसे शेतकऱ्यांना देता येतील. कारखान्याची डिस्टिलरी सध्या बंद आहे. आता त्याचा परवाना उपलब्ध झाला आहे. त्यामुळे डिस्टिलरी लवकरच पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येईल. इथेनॉल प्रकल्प सुरू केल्यास याहूनही शेतकऱ्यांना दर देणे शक्य होणार आहे. त्यामुळे इथेनॉल, डिस्टिलरी प्रकल्प भविष्यात पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांचा आज ही दौलत वर प्रचंड विश्वास आहे. म्हणूनच इतर कारखान्यांच्या तुलनेत दौलतला ऊस पुरवठा जास्त प्रमाणात होत आहे. हे येथील शेतकऱ्यांचे ऋण अथर्व कंपनी कधीही विसरणार नाही. शेतकरी सभासदांच्या शेतात यापुढे ऊस विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबविणार असून, उसाच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी अथर्व प्रयत्न करणार आहे. बंद अवस्थेत असलेल्या साखर कारखाना सुरू केल्यामुळे अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातून मार्गही निघत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता करण्याची गरज आज नाही. पुढील वर्षी पाच लाखांपेक्षा जास्त टनाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट आतापासूनच केले आहे. त्याचे नियोजन सुरू असल्याचेही ते म्हणाले.
कारखान्याच्या वजन काट्यावर शेतकऱ्यांचा प्रचंड विश्वास बसला आहे. शेतकरीच स्वतः आपली मते जनतेत मांडत आहेत. यापुढे येथील शेतकऱ्यांनी कारखान्यावर विश्वास ठेवून आपला संपूर्ण ऊस अथर्वला पाठवावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या पत्रकार परिषदेस अथर्वचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश चिटणीस, शेती अधिकारी पी जी पाटील, प्रशासन अधिकारी व्ही के ज्योती आदी उपस्थित होते.
काजू बोंडावर प्रक्रिया करणार्या उद्योगाचा अभ्यास करणार
चंदगड तालुक्यात २०० कोटी रुपयांचा काजूचा व्यवसाय होतो. मात्र अजूनही येथे काजू बोंडावर प्रक्रिया करणारा उद्योग झालेला नाही. या बाबतीतला अभ्यास करणार असल्याचे खोराटे यांनी यावेळी सांगितले. तर, शासनाकडे त्यांचा पाठपुरावा करून काजू बोंडापासून अल्कोहोल किंवा इथेनॉलची निर्मिती होत असेल, तर या व्यवसायातही अथर्व आपला पाय ठेवणार असून येथील काजू उत्पादक शेतकऱ्यांनाही न्याय मिळवून देण्यासाठी अथर्व प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.