जुन्या राजवाड्याच्या दालनात गणेशाची प्रतिष्ठापना
सुधाकर काशीद/कोल्हापूर
उंच गणेशमूर्ती, रोषणाईचा लखलखाट, आरत्यांचे इव्हेंट, भव्य मिरवणुका यात हरवलेला पारंपरिक गणेश उत्सव आता कोरोनाच्या निर्बंधांमुळे पुन्हा पिढीसमोर रुपात ठळकपणे समोर येऊ लागला आहे.
आज जुना राजवाडÎातील खजिन्याच्या दालनातील पारंपरिक गणेशमूर्ती पूजनाचा याचमुळे खूप बोलबाला झाला. जुन्या राजवाडÎाच्या असंख्य दालनापैकी वर्षभर बंद असलेल्या पण गणेशोत्सवातच उघडणाऱया खजिन्याच्या गूढ व कुतहुलाची किनार लाभलेल्या दालनात आज गणेशमूर्तीचे पूजन करण्यात आले. सहसा बाहेरच्या कोणाला या खजिन्याच्या दालनात जायची संधीच नसते. पण या पारंपरिक गणेशमूर्तीच्या निमित्ताने या दौलत खान्याच्या दर्शनाची संधी मिळते.
जुन्या राजवाडÎाची जी पोलीस ठाण्याची बाजू आहे, त्या बाजूने म्हणजे चक्क पोलीस निरीक्षक ज्या ठिकाणी बसतात तेथूनच या खजिन्याच्या दालनात जाता येते. एरवी हे दालन बंद असते. संस्थान काळात या दालनात खजिना होता. संस्थान कालीन नाणी पाडण्याची टांकसाळ होती. खजिना ठेवण्यासाठी लोखंडी भक्कम सळ्यांची एक खोली, एका पेटीत पाच-सहा जण बसू शकतील एवढे मोठे पेटारे होते. भिंतीवर ऐतिहासिक भित्तिचित्रे होती. लाल भडक रंगाची व त्यावर वेगळ्या पद्धतीची चित्र शैली होती. आणि तेथे गणेश उत्सवात समईच्या मंद प्रकाशात गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची पद्धत होती.
संस्थान काळानंतर खजिन्याचे संदर्भ बदलत गेले. पण खजिन्याचे दालन आपले अस्तित्व जपत तसेच राहिले. त्यात गणेशमूर्ती बसवण्याची पारंपरिक प्रथा चालू राहिली. वर्षभर हे दालन बंद असते. गणेश चतुर्थीपूर्वी ते उघडले जाते. जमीन शेणाने सारवली जाते. पांढरीशुभ्र बिछायत घातली जाते व चौरंगावर गणेश मूर्ती बसवली जाते. त्यामुळे या गणेश उत्सवाच्या काळात या दालनात लोकांची थोडीफार वर्दळ असते. सकाळी व संध्याकाळी होणाऱया आरतीच्या वेळी पोलीस निरीक्षक व जुना राजवाडÎातील पोलिसांची हमखास उपस्थिती असते. या दालनाच्या गूढ व कुतूहल मिश्रित ढाचा आजही कायम आहे. दालनात मोठमोठे दोन-तीन पेटारे खजिन्याचे साक्षिदार आहेत. पुसटशी दिसणारी जुनी चित्रे भिंतीवर आहेत. संस्थानकालीन खजिन्याचे दालन कसे होते हे पाहण्याची या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने संधी मिळते आहे. या दालनात जाण्यासाठी पोलीस ठाण्यातून एकमेव मार्ग आहे. आणि पोलीस बंधुना विनंती करूनच दौलत खान्यात जाणे शक्य आहे.









